मुंबईत CJPच्या आंदोलनाला परवानगी नाकारली? गांधी जयंतीला ‘जेल भरो आंदोलन’; अभिजीत दिपके यांचा इशारा


मुंबई : मुंबईत २ ऑक्टोबर, गांधी जयंतीच्या दिवशी प्रस्तावित आंदोलनावरून वाद निर्माण झाला आहे. कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दावा केला की, २ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. परवानगी न मिळाल्यास गांधी जयंतीच्या दिवशी मुंबईत ‘जेल भरो आंदोलन’ करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

अभिजीत दिपके यांचा दावा काय?

CJPकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह निवडणूक आयोगाशी संबंधित मुद्द्यांवर २ ऑक्टोबर रोजी मुंबईत आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात आले होते. या आंदोलनासाठी शिवाजी पार्क येथे परवानगी मागण्यात आली होती.

मात्र, मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्याचा दावा अभिजीत दिपके यांनी केला. नागरिकांचा आवाज दाबण्याचे प्रयत्न स्वीकारले जाणार नाहीत, असे म्हणत परवानगी न मिळाल्यास गांधी जयंतीच्या दिवशी मुंबईत ‘जेल भरो आंदोलन’ सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला.

मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण

दरम्यान, मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. शिवाजी पार्क येथे कोणत्याही सभेला किंवा जमावाला परवानगी देण्याचा अधिकार मुंबई पोलिसांकडे नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

यासाठी पोलिसांनी २०१३ मधील बॉम्बे हायकोर्टाच्या आदेशाचा आणि त्यानंतरच्या २०१६ मधील महाराष्ट्र सरकारच्या आदेशाचा हवाला दिला आहे. त्यामुळे हा पोलिसांचा स्वतंत्रपणे घेतलेला निर्णय नसल्याचे त्यांच्या स्पष्टीकरणातून स्पष्ट होते.

पर्यायी ठिकाणी आंदोलनाचा सल्ला

मुंबई पोलिसांनी अर्जदार अजिंक्य शिंदे यांना शिवाजी पार्कऐवजी मुंबईतील अन्य ठिकाणाचा पर्याय निवडण्याचा सल्ला दिला आहे. पर्यायी ठिकाणी आंदोलनासाठी नियमानुसार परवानगी मागितल्यास त्यावर विचार केला जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे २ ऑक्टोबरच्या आंदोलनाबाबत आता पुढील निर्णयाकडे लक्ष लागले आहे. शिवाजी पार्कऐवजी पर्यायी ठिकाणी आंदोलनासाठी परवानगी मिळते का आणि CJPकडून जाहीर करण्यात आलेले ‘जेल भरो आंदोलन’ प्रत्यक्षात होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!