Pune News : काय सांगता! ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्यासाठी आता जादूटोणा, उमेदवाराच्या फोटोवर….

Pune News : राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मात्र, निवडणूक जिंकण्यासाठी थेट जादूटोणाचा आधार घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुणे जिल्हयातील नारायणगाव येथे सुरु असलेल्या ग्रामपंचायात निवडणुकीत हा प्रकार समोर आला व त्याची आता राज्यभर चर्चा होऊ लागली आहे. या गावात निवडणूक जिंकण्यासाठी एका उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराच्या पराभवासाठी चक्क जादूटोण्याचा आधार घेतला आहे. Pune News
नारायणगाव ही पुणे जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ आहे. शहराइतक्या लोकसंख्येच्या या गावात अजूनही ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी रविवारी मतदान होत आहे. निवडणुकीतला प्रचार शुक्रवारी सायंकाळी संपला.

त्यानंतर उमेदवारांच्या फोटोवर बाहुली लावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर लिंबू आणि टाचण्या टोचल्याचा प्रकार उघड झाला आहे. नारायणगावातील भर वस्तीत फोटोसह लिंबू टाचण्या आढळल्या आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे.

नारायणगाव ग्रामपंचायतीत १७ जागा आहेत. एकूण सहा प्रभागातून ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सरपंचपदासाठी पाच उमेदवार होते. त्यापैकी तिघांनी माघार घेतल्यामुळे दोन उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.