Pune News : पुणे ( हवेली ) बाजार समितीच्या तत्कालीन संचालकांची नुकसान भरपाईच्या जबाबदारी नोटीस अब्दुल सत्तारांकडून ठरविली वैद्य! विद्यमान संचालक मंडळाच्या ४ संचालकांचे भवितव्य आधांतरीत ….!!
Pune News पुणे : पुणे बाजार समितीतील सुमारे तेवीस वर्षांपूर्वीच्या गैरकारभारासंदर्भात तत्कालीन संचालकांवर जबाबदारी निश्चितीची बजावलेली नोटीस पणनमंत्र्यांनी वैध ठरवली असतानाच, आता राज्याच्या पणन संचालकांनी दोन प्रशासकांच्या कारभारासह नवनियुक्त संचालक मंडळाच्या अवघ्या पाच महिन्यांच्या कारभाराची चौकशी लावली आहे.
चौकशीसाठी ८ वरिष्ठ अधिकाऱ्यांची फौज नियुक्त केली असून, पंधरा दिवसांच्या आत चौकशी अहवाल देण्याचे आदेश पणन संचालकांनी बजावले आहेत. त्यामुळे पुणे बाजार समितीला ग्रहण लागले असून, तत्कालीन तेवीस वर्षांपूर्वीच्या संचालक मंडळासह आता विद्यमान संचालक मंडळाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. Pune News
पुणे बाजार समितीचा कारभार कायमच चौकशीच्या ससेमिऱ्यात अडकला आहे. आर्थिक अनियमिततेप्रकरणी मुलाणी समितीने सुमारे तेवीस वर्षांपूर्वीच्या तत्कालीन संचालक मंडळावर सुमारे ८ कोटी ६६ लाख ५० हजार रुपयांचा ठपका ठेवला होता.
जुन्या चौकशांचे घोंगडे भिजत असतानाच, मे महिन्यात निवडून आलेल्या नवनियुक्त संचालक मंडळाच्या कारभाराची घडी बसण्यापूर्वीच त्यास दृष्ट लागली आहे. पणन संचालकांनी नियमित तपासणीसाठी दोन प्रशासकांच्या काळातील कारभारासह नवीन संचालक मंडळाच्या पाच महिन्यांतील कारभाराचीदेखील चौकशी लावली आहे. त्यामुळे विद्यमान नवनियुक्त संचालक मंडळाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
तत्कालीन संचालक मंडळावर साडेआठ कोटींच्या गैरव्यवहाराचा ठपका
बाजार समितीत १९९९ ते २००२ या कालावधीत आर्थिक अनियमितता झाल्याप्रकरणी तत्कालीन संचालक मंडळावर सुमारे ८ कोटी ६६ लाख ५० हजार रुपयांच्या गैरव्यवहाराचा ठपका ठेवला होता. याबाबत जिल्हा उपनिबंधकांनी संचालक मंडळावर जबाबदारी निश्चितीचे आदेश दिले होते.
दरम्यान, पणनमंत्री सत्तार यांनी या प्रकरणाची सुनावणी घेऊन ६० दिवसांत चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे विद्यमान पाच संचालकांसह तत्कालीन बारा संचालकांना हा धक्का आहे.