Pune News : मतदान करा अन् निम्म्या किमतीत ‘पॉट आईस्क्रीम खा, पुण्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अनोखी शक्कल…

Pune News : लोकसभा निवडणुकीचे तीन टप्प्यातील मतदान देशभरात पडले आहे. मात्र अजूनही मतदानाचे चार टप्पे बाकी आहेत. महाराष्ट्रातही तीन टप्प्यांत मतदान झाले आहे मात्र अद्यापही पुणे, नाशिक, मुंबईसह अनेक महत्वाच्या टप्प्यातील मतदान बाकी आहे.

याच पार्श्वभूमीवर पुण्यात वाढत्या उन्हाळ्यात पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढावी आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडणाऱ्या मतदारांचे कौतुक व्हावे,या हेतूने मतदान करणाऱ्या पुणेकर मतदारांना निम्म्या किमतीत ‘पॉट आईस्क्रीम’चा कप देण्यात येणार आहे.
शिरीष ट्रेडर्स’ चे संस्थापक शिरीष बोधनी यांनी ही माहिती दिली आहे. पुणेकरांसाठी खास ऑफर दिली आहे. मतदान करा आणि भर उन्हात आईस्क्रिम खाण्याचा आनंद लुटता येणार आहे. Pune News

पुण्यात प्रसिद्ध असलेले लाकडी पॉटमध्ये केलेले आईस्क्रीम हे उन्हाळ्यात आकर्षण असते. कमला नेहरू पार्क दत्त मंदिराजवळ (प्रभात रस्ता) येथे शिरीष बोधनी हा व्यवसाय करतात. त्यांचे पॉट आइसक्रीम ४० वर्षाहून अधिक काळ प्रसिद्ध आहे.

मतदानाची टक्केवारी वाढावी आणि लोकशाहीचे कर्तव्य बजावणाऱ्या मतदारांचे कौतुक व्हावे,यासाठी सोमवार,१३ मेरोजी मतदानाच्या दिवशी सकाळी ९ ते दुपारी १२ या कालावधीत मतदान करून आलेल्या मतदाराला आईस्क्रीम कप निम्म्या किमतीत दिला जाणार आहे.
दुपारी उन्हे वाढायच्या आत मतदारांनी मतदान करावे ,यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे,असे शिरीष बोधनी यांनी सांगितले. एरवी हे आईस्क्रीम ६० रुपयांना दिले जाते, मतदानाच्या दिवशी ते निम्म्या किमतीत म्हणजे ३० रुपयांना दिले जाणार आहे.