व्यापारी बँकांचा ‘झोल’ अन् साडेपाच लाख शेतकरी ताटकळले! सहकार विभागाने बँकांना यादी परत पाठवली; कारण काय?

पुणे : राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सहकार विभागाकडून सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांची यादी चार ते पाच बँकांना परत पाठवण्यात आल्याची माहिती आहे. बँकांनी सादर केलेल्या कर्जाच्या तपशीलात व्याज आकारणी, बँक खात्यांची माहिती आणि कर्ज प्रकरणांमध्ये तफावत आढळल्याने ही यादी परत पाठवण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
बँकांनी शासनाकडून अतिरिक्त निधी मिळवण्यासाठी काही कर्जखात्यांमध्ये चुकीच्या पद्धतीने व्याज आकारले आहे का, याचीही तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे. शासनावर चुकीच्या व्याज आकारणीचा अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, यासाठी सहकार विभागाचे लेखापरीक्षक संबंधित खात्यांची तपासणी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

साडेपाच लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा
संबंधित यादीमध्ये दोन लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत अशा सुमारे २१ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याची माहिती आहे.


बँकांकडून दुरुस्त माहिती प्राप्त झाल्यानंतर उर्वरित सुमारे ५.५० लाख शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळण्याची प्रक्रिया पुढे जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दोन लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज असलेल्या एकूण सुमारे २६.५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकीत कर्ज असलेल्या सुमारे २.९० लाख शेतकऱ्यांनाही पुढील टप्प्यात कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राज्य सरकारने ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६ हजार ५८५ कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सुरू असून, यापूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या यादीत ३ लाख ५५ हजार ६१४ शेतकऱ्यांचा समावेश होता.
बँकांच्या डेटामध्ये तफावत?
पुढील टप्प्यातील लाभार्थ्यांच्या यादीत प्रामुख्याने व्यापारी बँकांशी संबंधित शेतकरी असल्याचे सांगण्यात येत आहे. या बँकांकडून सादर करण्यात आलेल्या कर्जाच्या डेटाची सहकार विभागाकडील उपलब्ध आकडेवारीशी तुलना करण्यात आली. त्यावेळी शेतकऱ्यांची प्रत्यक्ष थकबाकी आणि बँकांनी दाखवलेली थकबाकी यामध्ये तफावत आढळल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे संबंधित यादी पुन्हा बँकांकडे पाठवून आवश्यक दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दुरुस्त माहिती मिळाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे.
दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची व्हायरल यादी बनावट?
दरम्यान, राज्यात दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची यादी सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, शासनाकडून अद्याप दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नसल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही अनधिकृत यादीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन भरणे यांनी केले आहे. बनावट यादी तयार करून ती प्रसारित करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जमाफीसंदर्भातील अधिकृत माहिती आणि पात्र लाभार्थींच्या याद्यांसाठी शासनाच्या अधिकृत माध्यमांवरच विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे.