Pune News : ९ हजार पोलीस, २०५ सीसीटीव्ही केमॅरे, गणपती विसर्जनासाठी पुण्यात मोठा बंदोबस्त…

Pune News पुणे : पुणेकर आपल्या लाडक्या गणरायला उद्या गुरुवारी निरोप देणार आहेत. दरवर्षीप्रमाणे पुणेपोलिस दल देखील बंदोबस्तासाठी सज्ज झाल्याची माहिती पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मंगळवारी दिली आहे. (Pune News)

तसेच शहरात ३ हजार ८६५ सार्वजनिक गणेश मंडळे असून ६ लाख १४ हजार २५७ गणरायांची घरात स्थापना झालेली आहे. पुणे पोलिसांकडून विसर्जन मिरवणुकीवेळी सगळे सुरळीत आणि वेळेत व्हावे यासाठी वेळोवेळी गणेश मंडळांसह ढोल-ताशा पथकांसोबत समन्वय बैठका घेण्यात आल्या होत्या, अशी माहिती देखील आयुक्तांनी दिली.
उद्या पासून म्हणजेच २८ सप्टेंबर गुरुवारपासून विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत ९ हजार पोलिसांचा खडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, विसर्जन मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर २०५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखील लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती आहे.

पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह या मार्गावरील खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखील पोलिस निगराणी ठेवणार आहेत. या पत्रकार परिषदेवेळी पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, वाहतूक शाखेचे पोलिस आयुक्त विजयकुमार मगर, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे आणि परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांची उपस्थिती होती.

दरम्यान, या कालावधीत लोकांना वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तसेच २६ ठिकाणी पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे.
नागरिकांना वाहतूक मार्गदर्शनासाठी ‘सारथी गणेशोत्सव गाईड २०२३’ चे फलक जागोजागी लावण्यात येत आहेत. महिला छेडछाड, चैन स्नॅचिंग सारख्या घटना घडू नयेत यासाठी विशेष पथके साध्या वेशात तैनात केली जाणार असल्याची माहिती आहे.