पुणे मेट्रोचे वेळापत्रक जाहीर! हिंजवडी ते शिवाजीनगर प्रवासासाठी किती तिकीट लागणार? पाहा १७ स्थानकांची यादी

पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्याची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी मोठी बातमी आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या बहुप्रतीक्षित मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले आहे. आता ४ नोव्हेंबरपासून या मार्गावर नियमित प्रवासी सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांसह या मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे वेळापत्रक काय?
नव्या मेट्रो मार्गिकेवर माण स्थानकातून सकाळी ६ वाजता पहिली मेट्रो धावणार आहे. गर्दीच्या वेळेत दर ६ मिनिटांनी, तर इतर वेळेत दर १२ मिनिटांनी मेट्रो उपलब्ध होईल. माण स्थानकातून जिल्हा न्यायालयाच्या दिशेने रात्री १०.३० वाजता शेवटची मेट्रो सुटेल. तर जिल्हा न्यायालय स्थानकातून माणच्या दिशेने रात्री ११.४० वाजता शेवटची मेट्रो रवाना होणार आहे.

या मार्गिकेवर दररोज सुमारे २ ते २.५ लाख प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. संपूर्ण मार्गावर २३ स्थानके उभारण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात १७ स्थानकांवर प्रवासी सेवा सुरू होणार आहे. उर्वरित ६ स्थानकांचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने ती सध्या प्रवाशांसाठी बंद राहतील.

पहिल्या टप्प्यातील १७ मेट्रो स्थानके कोणती?
१. माण
२. माण-एमआयडीसी सर्कल
३. माण बस डेपो
४. हिंजवडी फेज २-सर्कल २
५. हिंजवडी फेज २-सर्कल १
६. पद्मभूषण चौक
७. श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक-हिंजवडी
८. हिंजवडी फेज १
९. वाकड चौक
१०. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल-म्हाळुंगे
११. मिटकॉन-बालेवाडी
१२. आर. के. लक्ष्मण म्युझियम-बालेवाडी
१३. औंध
१४. सकाळनगर
१५. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
१६. कृषी महाविद्यालय
१७. जिल्हा न्यायालय, पुणे
हिंजवडी मेट्रोचे तिकीट दर किती?
नव्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे तिकीट दर सध्या सुरू असलेल्या महामेट्रोच्या मार्गिकांपेक्षा अधिक आहेत. पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर तिकिटासाठी किमान १० रुपये आणि कमाल ३५ रुपये आकारले जातात. मात्र, माण ते शिवाजीनगर मार्गिकेसाठी किमान १२ रुपये, तर कमाल ६२ रुपये तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत.
मेट्रो मार्गिका
अंतर
किमान तिकीट
कमाल तिकीट
पीसीएमसी ते स्वारगेट
१६.६ किमी
१० रुपये
३५ रुपये
वनाज ते रामवाडी
१४.६ किमी
१० रुपये
३५ रुपये
माण ते शिवाजीनगर
२३.२ किमी
१२ रुपये
६२ रुपये
म्हणजेच नव्या मार्गिकेवर किमान तिकिटासाठी २ रुपये, तर कमाल तिकिटासाठी २७ रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी ३१ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत या दरांची माहिती दिली होती.
पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीला मिळणार नवी दिशा
पुणे मेट्रोची मार्गिका ३ अर्थात पिंक लाईन ही माण-हिंजवडी ते शिवाजीनगर अशी २३.२ किलोमीटर लांबीची आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ८,३०० कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे. या मार्गिकेमुळे हिंजवडी आयटी पार्क, वाकड, बालेवाडी, औंध आणि शिवाजीनगर परिसरातील प्रवास अधिक सोयीचा होण्याची अपेक्षा आहे.
विशेषतः आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दररोजच्या वाहतूक कोंडीतून दिलासा मिळू शकतो. त्यामुळे पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत या नव्या मेट्रो मार्गिकेची भर महत्त्वाची ठरणार आहे.
