पुण्याला पावसाने झोडपले, ११ ठिकाणी झाडे कोसळल्याने ट्रॅफिक जाम..

पुणे : राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान गेले तीन ते चार दिवस पुण्यात देखील ढगाळ हवामान दिसून येत होते. आज अखेर पुण्यात पावसाने हजेरी लावली आहे. पुण्याच्या विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लवी.
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडलेली पाहायला मिळाली आहे. सायंकाळच्या सुमारास आलेल्या जोरदार वाऱ्यासह पावसामुळे शहरातील ११ ठिकाणी झाडे कोसळली असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
शहरातील विविध भागांत झाडे कोसळल्यामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले असून, वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. औंधच्या मेडिपॉईंट हॉस्पिटल रस्त्यावर आणि बावधनच्या शिंदे नगर परिसरात इलेक्ट्रिक डीपीवर झाड कोसळल्याच्या घटना घडल्या. हडपसरमधील मगरपट्टा चौक, मार्केटयार्डमधील संदेश सोसायटी परिसर आणि किर्लोसकर कंपनीमागील भागातही झाडे कोसळल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, वारज्यातील चर्चसमोरच्या रस्त्यावर, बाणेरच्या आंबेडकर नगर आणि कुमठेकर रोडवरील आवारे खानावळ जवळ चारचाकी वाहनांवर झाड कोसळल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे. हडपसरच्या रामटेकडी परिसरातही अशीच घटना घडली. बालेवाडी परिसरात लोखंडी शेड कोसळल्याने एक जण जखमी झाला आहे.
अचानक आलेल्या या पावसामुळे जंगली महाराज रोड परिसरात सुमारे एक किलोमीटरपर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. शहराच्या मुख्य मार्गांवर वाहनचालकांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले.