Pune Accident : निबंध अडकवणार!! तातडीने जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाचे सदस्य डॉ. एल. एन धनवडे वादाच्या भोवऱ्यात…

Pune Accident : पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. बेदरकारपणे आपल्या बापाच्या महागड्या कारनं दोघांना चिरडणारा धनिकपुत्र आणि अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी संपूर्ण प्रशासन कामाला लागल्याचे धक्कादायक वास्तवही या प्रकरणात समोर आले आहे.
या प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे वडील, आजोबा, ससूनमधील डाॅक्टर , शिपाई यांना अटक केल्यानंतर जामीन मंजूर केलेले बाल न्याय मंडळातील नियुक्त सदस्य डॉ. एल एन धनवडे यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात कारचालक मुलाला तातडीने जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाचे सदस्य डॉ. एल एन धनवडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. जामीनाबाबत निर्णय देत असताना तीन सदस्यांनी निर्णय देणे अपेक्षित असताना अन्य दोघांच्या अनुपस्थितीत रविवारी सुट्टी असताना धनवडे यांनी हा वादग्रस्त निकाल दिला होता. Pune Accident
त्याबाबत पोलिसांनी सत्र न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली. त्यानंतर सत्र न्यायालयाने पोलिसांना पुन्हा बाल न्याय मंडळाकडे जाण्याचे निर्देश दिले. त्यानंतर धनवडे यांनी पूर्वीचा निर्णय बदलत संबंधित मुलाला १४ दिवस निरीक्षण गृहात पाठवण्याचा निर्णय दिला.
कल्याणीनगर पोर्शे कार अपघातातील आरोपी अल्पवयीन होता. यामुळे त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले. दोन जणांचा जीव घेणाऱ्या आरोपीस ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा डॉ. एल एन धनवडे यांनी दिली होती. यानंतर ते अडचणीत आले आहे.
फक्त १४ तासात त्याला जामीन मिळाला. सुटकेनंतर १५ दिवस ट्रॅफिक पोलिसांबरोबर काम करण्याचेही त्याला सांगण्यात आले होते. या अनोख्या शिक्षेची सर्वत्र चर्चा झाली तसेच चौफेर टीकादेखील झाली. त्यानंतर शिक्षा रद्द करत अल्पवयीन आरोपीला बालसुधार गृहात पाठवण्यात आले. Pune Accident
अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल ज्या अर्थी मुलाचे तपासणीसाठी पाठविलेले रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ससूनमधील डॉ. अजय तावरे आणि डाॅ. श्रीहरी हळनोर यांच्याशी आर्थिक व्यवहार करू शकतो, ते पाहता मुलाच्या जामिनासाठीही आर्थिक व्यवहार करू शकतो, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
त्यामुळे रविवारी (दि. १९) रोजी या गुन्ह्यातील विशाल आगरवाल याने कोणाच्या माध्यमातून डॉ. एल एन धनवडे यांना संपर्क केला आहे का, याचा तपास करण्यात येणार आहे. या गुन्ह्यातील सर्वांच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड महत्त्वाचे असून ते तपासले जाणार असल्याची चर्चा आहे.
या प्रकरणाची महिला व बालविकास मंडळाने गंभीर दखल घेतली असून त्यानुसार त्या विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली अन्य चार सदस्यांची समिती नेमली आहे. यात कायदे तज्ञांचाही समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत या समितीने धनवडे यांचा जबाब घेतला आहे.
या अहवालात संबंधित दोषी आढळल्यास नियंत्रण, फटकारे, व्यवसाय बंद करणे तसेच सदस्य म्हणून सेवासमाप्ती करण्याची तरतूद आहे. या प्रकरणात कोणताही पूर्वग्रह न ठेवता चौकशी पूर्ण केली जाईल. लवकरच त्याबाबत निर्णय घेण्यात येईल” असे डॉ. प्रशांत नारनवरे , आयुक्त महिला व बालविकास, पुणे यांनी सांगितले आहे.