ड्युटीवर आले, अचानक छातीत कळ आली अन् काळाने हिरावलं; शिंदेंच्या एस्कॉर्टमधील PSI विजय सांगडे यांचा मृत्यू


ठाणे : सकाळी नेहमीप्रमाणे ड्युटीवर हजर झाले, काही वेळातच अचानक छातीत दुखू लागले आणि चक्कर आली… रुग्णालयात उपचार सुरू झाले, मात्र काही वेळातच पोलीस उपनिरीक्षक विजय सांगडे यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एस्कॉर्ट पथकात गेल्या तीन वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या सांगडे यांच्या आकस्मिक निधनाने पोलीस दलासह कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

विजय सांगडे हे ५७ वर्षांचे होते. सोमवारी सकाळी ते कर्तव्यावर आले होते. ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात असताना त्यांना अचानक छातीत वेदना सुरू झाल्या. त्यानंतर त्यांना चक्करही आली. परिस्थिती लक्षात येताच सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांकडून उपचार सुरू करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सांगडे हे गेल्या तीन वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एस्कॉर्ट पथकात कार्यरत होते. कर्तव्यावर असतानाच त्यांची अचानक प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याने त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. ते डोंबिवलीतील पलावा सिटी येथे कुटुंबासोबत राहत होते. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

दरम्यान, दिवंगत पोलीस उपनिरीक्षक विजय सांगडे यांना ठाणे सिव्हिल रुग्णालय परिसरात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने त्यांना मानवंदना आणि श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, परिमंडळ-५चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

पोलीस दलाकडून विजय सांगडे यांना बंदुकीची सलामी देत अखेरची मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेण्यात येणार आहे. कर्तव्य बजावत असतानाच एका अनुभवी पोलीस अधिकाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्याने ठाणे पोलीस दलात शोकाचे वातावरण आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!