क्रिकेटचा देव आमचा जुगार खेळतो, सचिनच्या घराबाहेर बच्चू कडूंचे आंदोलन, पोलिसांनी घेतले ताब्यात…

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या विरोधात माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील प्रहार संघटना अधिकच आक्रमक झाली आहे. प्रहार संघटनेने आज सचिन तेंडुलकर यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली आहे.
सचिन करत असलेल्या ऑनलाईन गेमिंग जाहीराती विरोधात त्यांनी आंदोलन पुकारले होते. बच्चू कडू यांना आता त्यांच्या कार्यकर्त्यांसह ताब्यात घेण्यात आले आहे. कडू यांनी तेंडुलकरांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.
यावेळी देव आमचा जुगार खेळतो, परत करा, परत करा, भारत रत्न परत करा, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. बच्चू कडू यांच्या नेतृत्वातच ही आंदोलने झाली.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी एका जुगाराच्या जाहिरातीत काम केलं आहे. सचिन यांच्या ऑनलाईन गेमची जाहिरात करण्यावर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आक्षेप घेतला आहे.
सचिन तेंडुलकर भारतरत्न आहेत. त्यांना देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ते जुगाराला प्रोत्साहन देणारी जाहिरात कशी करू शकतात? असा सवाल करत बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकर यांना कडाडून विरोध केला.
बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकर यांना जाहिरात केल्याबद्दल जाहीर माफी मागण्याची मागणीही केली होती. पण सचिन यांच्याकडून कोणताच प्रतिसाद आला नाही. तसेच बच्चू कडू यांनी या प्रकरणात राज्य सरकारने हस्तक्षेप करून सचिन यांना या जाहिरातीतून माघार घेण्याची विनंती केली होती.
पण राज्य सरकारनेही त्याकडे दुर्लक्ष केले. राज्य सरकारच काही करत नसल्याने निराश झालेल्या बच्चू कडू यांनी आज अखेर त्यांच्या समर्थकांसह सचिन यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी जोरदार निदर्शने केली.