इनर रिंग रोड, मेट्रो लाईन-३, मल्टिमोडल हब, औद्योगिक व पर्यटन कनेक्टिव्हिटीसह पाणी, घनकचरा व्यवस्थापन, अग्निशमनसह नदी प्रदूषण नियंत्रणाला प्राधान्य द्या; पीएमआरडीएच्या कामांचा सुनेत्रा पवार याच्याकडून आढावा

मुंबई : पुणे जिल्ह्याच्या नियोजित व सर्वांगीण विकासामध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, पीएमआरडीए क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे अधिक वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज दिले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पीएमआरडीए क्षेत्रातील विविध विकासकामांचा आढावा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतला. यावेळी पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, सह आयुक्त (प्रशासन) रुपाली आवले-डंबे, सह आयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता, प्रभारी सह आयुक्त (अनधिकृत बांधकाम) हिम्मत खराडे, महानगर नियोजनकार स्मिता कलकुटकी, मुख्य अभियंता, अभियांत्रिकी विशेष प्रकल्प रिनाज पठाण, प्रभारी मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी यांच्यासह पीएमआरडीएचे संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात ६७४ गावांचा समावेश असून, सुमारे ५,२१५ चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश आहे. पुणे महानगर प्रदेशाचा झपाट्याने होत असलेला विस्तार, वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, नागरीकरण आणि पर्यटनाच्या वाढत्या संधी लक्षात घेऊन पुढील अनेक वर्षांचा विचार करून पायाभूत सुविधांचे नियोजन करावे.
इनर रिंग रोडसह वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भर
पुणे इनर रिंग रोड, सीएमपी कॉम्प्रेहेंसिव्ह मोबिलिटी प्लॅन अंतर्गत प्रस्तावित प्रकल्प, हिंगणगाव पूल, यवत रेल्वे ब्रिज आदी प्रकल्पांना आवश्यक ती गती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुणे शहर आणि पीएमआरडीए क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध भागांना जोडणारी प्रभावी कनेक्टिव्हिटी विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मल्टिमोडल हब, औद्योगिक कनेक्टिव्हिटी, धार्मिक स्थळांची कनेक्टिव्हिटी, पर्यटन कनेक्टिव्हिटी तसेच विमानतळाशी जोडणी यांचा एकात्मिक विचार करून नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रोला गती
पुण्यातील माण–हिंजवडी परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता माण–हिंजवडी–शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन-३चे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. या २३ स्थानकांच्या मेट्रो मार्गिकेतील १२ स्थानके पूर्ण झाली असून, आणखी ५ स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. उर्वरित कामांना गती देऊन हा प्रकल्प नागरिकांच्या सेवेत लवकरात लवकर आणण्यासाठी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.