गरीबांना दिलासा ! बाजारात गहू ,खाद्यतेलाचे भाव कोसळले…!

पुणे : महिनाअखेर खुल्या बाजारातील धान्याचे भाव घसरले आहेत . गव्हाच्या विक्रीत गेल्या आठवड्यातही दारात घसरण दिसत आहे . मागणीअभावी खाद्यतेल आणि गुळाची उलाढाल मंदावली
आहे.

केंद्र सरकारने खुल्या बाजारात गव्हाची विक्री करण्याचे घोषित केल्यामुळे गव्हाची दरवाढ थांबली आहे तसेच दरात 100 रुपयांनी घट झाली आहे. मात्र या सर्वांत गुळाचे दर तेजीतच असल्याचे सांगण्यात येत आहे.
देशातील बाजारपेठेत गव्हाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गव्हाचे दर सातत्याने वाढत होते. या दरवाढीची दखल घेऊन केंद्र सरकारने तीस लाख टन गहू खुल्या बाजारात उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे.

यानिर्णयाने दरवाढ थांबून हलक्या प्रतीच्या – मिलबर गव्हाच्या दरात क्विंटलमागे 100 रुपयांनी घट झाली आहे. गुजरातमधील सौराष्ट्र भागात नव्या गव्हाची तुरळक प्रमाणात आवक सुरु झाली असून, येत्या 15 दिवसांत नियमित आवक सुरु होईल. त्यानंतर अन्य राज्यांतूनही नव्या गव्हाची आवक अपेक्षित आहे.

खाद्यतेलांमधील घसरण सुरूच आंतरराष्ट्रीय बाजारात आवक मुबलक असून, मागणी कमी असल्यामुळे सुर्यफूल, पामोलिन, तसेच सोयाबीन तेलाचे दर सातत्याने घसरत आहेत. गेल्या आठवड्यातही या सर्व खाद्यतेलांच्या दरात टनामागे आणखी 40 ते 50 डॉलर्संनी घट झाली. याचा परिणाम म्हणून तसेच मागणीचा अभाव असल्यामुळे येथील घाऊक बाजारातही सोयाबीन, सुर्यफूल, पामोलिन तेलाच्या दरात 15 किलोमागे आणखी 30 ते 40 रुपयांनी घट झाली आहे.
निर्यातीमुळे शेंगदाण्याचा तुटवडा निर्माण झाला असून दर सातत्याने वाढत आहेत. गेल्या आठवड्यातही सर्व प्रकारच्या शेंगदाण्याच्या दरात क्विंटलमागे आणखी 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली. घाऊक बाजारात शेंगदाण्याचे दर 125 रुपयांपर्यंत किरकोळ बाजारात प्रतिकिलोचा दर 140 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला.
पुण्याच्या घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे :
साखर (प्रतिक्विंटल) : 3450-3500 रु.
खाद्यतेले (15 किलो/लिटर) : शेंगदाणा तेल 2620-2720, रिफाईंड तेल ः 2475-3000, सरकी तेल 1800-2100, सोयाबीन तेल 1750-2000, पामतेल 1400-1650, सूर्यफुल रिफाईंड तेल 1800-2050, वनस्पती तूप 1380-1880, खोबरेल तेल 2250 रु.
तांदूळ : गुजरात उकडा 3200-3500, मसुरी 3000-3300, सोनामसुरी 4000-4400, एच.एम.टी. कोलम 4500-5000, लचकारी कोलम 5500-6000, चिन्नोर 4500-5000, 1121-10000-11000, आंबेमोहोर (सुवासिक) 7000-8000, बासमती अखंड 11500-12000, बासमती दुबार 8500-9000, बासमती तिबार 9500-10000, बासमती मोगरा 4500-5000, बासमती कणी 3200-3500, 1509-8000-8500, इंद्रायणी 4500-5000 रु.
गहू : सौराष्ट्र लोकवन नं. 1 3900-4200, सौराष्ट्र लोकवन नं. 2 3500-3800, एम.पी. लोकवन 3300-3600, सिहोर नं. 1 5000-5600, सिहोर नं. 2 4200-4500, सिहोरी 3600-4200, मिलबर 3200 रु. शेंगदाणा :- जाडा 11500-12500, स्पॅनिश – 12500, घुंगरू 12000-12100, टीजे 10700-10800 रु. गूळ :- गूळ एकस्ट्रा 3800-4100, गूळ नं. 1 3500-3700, गूळ नं. 2 3250-3400, गूळ नं.3 3000-3200, बॉक्स पॅकिंग 3400-4700 रु. डाळी :- तूरडाळ 1000-11000, हरभराडाळ 5800-5900, मूगडाळ 9500-10000, मसूरडाळ 7600-7700, मटकीडाळ 9800-10000, उडीदडाळ 8000-10000 रु.
आवक कमी असल्याने गूळ तेजीत
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झाल्यामुळे गूळ उत्पादकांना ऊसाची कमतरता जाणवत आहे. यामुळे सध्या गुळाचे उत्पादन कमी प्रमाणात होत आहे. अन्य राज्यातही थोडयाफार प्रमाणात हीच स्थिती आहे. यामुळे ऐन हंगामातच गुळाचे दर वाढू लागले आहेत. अन्य राज्यांततूनही महाराष्ट्रातील गुळास चांगली मागणी आहे. यामुळे गेल्या आठवडयातही गुळाच्या दरात क्विंटलमागे आणखी 100 रुपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.