एक लिटर दुधाला देशी दारूच्या क्वॉर्टर एवढी किंमत द्या!! आता दूध दरासाठी ‘हा’ नेता मैदानात

मुंबई : दुधाचे दर सध्या खाली आले असून दुधाला चांगला हमीभाव मिळत नाही. यामुळे शेतकरी अडचणीत येतो. असे असताना आता यावरून रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आक्रमक झाले आहेत.
त्यांनी देशी दारूच्या क्वॉर्टर इतकी किंमत एक लिटर दुधाला देण्यात यावी अशी अजब मागणी केली आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक या ठिकाणी रयत क्रांती संघटनेचा शेतकरी मेळावा पार पडला.
यावेळी त्यांनी ही मागणी केली आहे. गाईच्या दुधाला प्रति लिटरला ७५ रुपये दर तर म्हशीच्या दुधाला सव्वाशे रुपये प्रति लिटर दर मिळाला पाहिजे. सरकारला ही भाववाढ देणे अवघड नाही, असेही ते म्हणाले.
जर त्यांनी हा दर दिला तर महागाई कमी होईल. तसेच पुण्यात २२ मे रोजी दुधाच्या प्रश्नावर रयत क्रांती संघटनेकडून यात्रा काढण्यात आली होती. यामुळे दुग्धविकास मंत्रालयाने बैठक बोलावली असून या बैठकीत आम्ही दुधासंबंधीचे प्रश्न मांडणार आहे, असेही ते म्हणाले.
तसेच आम्ही ऊस बिलासाठी येत्या १जुलै रोजी साखर कारखान्यासमोर एक दिवस धरणे आंदोलन करणार आहे, असा इशाराही खोत यांनी यावेळी दिला आहे.