शिरूरमध्ये सराईत गुन्हेगाराविरोधात पोलिसांचा मोठा बडगा; MPDA अंतर्गत कारवाई


शिरूर : शिरूर तालुक्यातील सराईत व धोकादायक इसमाविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांनी MPDA कायद्यान्वये कारवाई केली आहे. आरोपीला ताब्यात घेऊन अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. ही कारवाई बुधवार (ता.१३) रोजी करण्यात आली आहे.

भरत शिवाजी गव्हाणे (वय ४०, रा. बगीचा हॉटेलसमोर, कोरेगाव भीमा, ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत गव्हाणे याच्याविरोधात मागील काही वर्षांत गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपीकडून परिसरात दहशत निर्माण करून नागरिकांना धमकावणे, खंडणीसाठी दबाव टाकणे, मारहाण करणे तसेच जीवघेणे हल्ले करण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

यापूर्वी आरोपीविरोधात बेकायदेशीर अग्निशस्त्राचा वापर करून खंडणीसाठी धमक्या देणे, फिर्यादीला जखमी करणे, घरात घुसून मारहाण करणे, शिवीगाळ आणि दमदाटी करणे तसेच खुनाचा प्रयत्न करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. भारतीय दंड विधान, भारतीय न्याय संहिता २०२३ आणि भारतीय हत्यार कायदा १९५९ अंतर्गत त्याच्यावर विविध प्रकरणे नोंदवण्यात आली होती.

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शिपरतन गायकवाड यांनी आरोपीविरोधात MPDA अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता.

हा प्रस्ताव पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी यांनी मंजूर करत आरोपीला महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिव्हिटीज (MPDA) अंतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने १३ मे २०२६ रोजी आरोपीला ताब्यात घेत अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश बनकर, पो. हवा जनार्दन शेळके, पो. हवा रोहिदास पारखे, शिवाजी चितारे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील, अमोल नलगे, नारायण वाळके, राम जाधव, मच्छिंद्र निचीत आणि प्रतीक जगताप यांनी सहभाग घेतला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!