राष्ट्रवादीत मोठी खळबळ! इद्रिस नायकवडींना आमदारकीचा राजीनामा देण्याचा दबाव? ‘देवगिरी’ बैठकीतील चर्चांनी राजकारण तापले


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या धक्कादायक राजकीय घडामोडींमध्ये आणखी एका मोठ्या निर्णयाची चर्चा रंगू लागली आहे. पक्षाच्या मुंबईतील ‘देवगिरी’ बंगल्यावर आज सकाळी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा मागण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे पक्षाच्या अंतर्गत राजकारणाबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, युवा नेते पार्थ पवार तसेच आमदार इद्रिस नायकवडी उपस्थित होते. पक्षाच्या आगामी राजकीय रणनीतीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

बैठकीदरम्यान वरिष्ठ नेत्यांनी नायकवडी यांना आमदारकीचा राजीनामा देण्याची विनंती केल्याचे सांगितले जात आहे. राजीनामा दिल्यास पक्षाकडून भविष्यात मोठी राजकीय जबाबदारी किंवा त्यापेक्षा चांगली संधी दिली जाईल, असे आश्वासनही त्यांना देण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, नायकवडी यांनी सध्यातरी आमदारकीचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिल्याचे समजते.

विशेष म्हणजे, नायकवडी यांच्याकडे राजीनाम्याची मागणी प्रथमच करण्यात आलेली नाही. यापूर्वीही पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आजच्या बैठकीनंतर या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे.

इद्रिस नायकवडी हे राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषदेवर निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. पक्षातील अल्पसंख्यांक समाजाचा प्रभावी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. दरम्यान, नायकवडी यांनी जागा रिक्त केल्यास त्या ठिकाणी पक्षातील नव्या आणि तरुण नेतृत्वाला संधी देण्याबाबत काही नेते आग्रही असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः युवा नेतृत्वाला अधिक प्रतिनिधित्व देण्याच्या भूमिकेतून काही हालचाली सुरू असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली.

राजकीय वर्तुळात आणखी एक चर्चा म्हणजे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नायकवडी यांच्यावर दाखवलेला विश्वास. पक्षातील निष्ठावान आणि विश्वासू अल्पसंख्यांक चेहरा म्हणून त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली होती. मात्र बदलत्या नेतृत्वाच्या समीकरणांमध्ये आता त्यांच्यावर दबाव वाढत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी, नेतृत्वातील बदल आणि आगामी राजकीय रणनीती याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ‘देवगिरी’ बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर पक्षातील समीकरणे नेमकी कोणत्या दिशेने जाणार, याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!