गोकुळच्या खुर्चीसाठी महायुतीतच रस्सीखेच! भाजप अध्यक्षपदापासून दूर राहणार? राष्ट्रवादीला पहिली संधी, रात्रीतून ठरला सत्तावाटपाचा फॉर्म्युला


कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज होत असताना महायुतीमधील अंतर्गत राजकारणाला वेग आला आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकल्या, तर महायुतीला १२ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे अध्यक्षपद समविचारी आघाडीकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, राज्य सरकारने चार शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्याने सत्तेचे गणित बदलले आहे. आता अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महायुतीनेच नवा फॉर्म्युला आखल्याची चर्चा आहे.

चार शासननियुक्त संचालक ठरणार निर्णायक

गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीचे १३ आणि महायुतीचे १२ संचालक निवडून आले होते. मात्र, महायुती सरकारने शिवाजी दिनकर आडनाईक, डॉ. प्रवीणचंद्र हेंद्रे, प्रशांत भगवान पाटोळे आणि कृष्णात ज्ञानदेव पाटील या चार जणांची शासननियुक्त संचालक म्हणून नियुक्ती केली. या चौघांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळाल्याने महायुतीचे संख्याबळ वाढले आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत या चार मतांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

रात्रीच्या बैठकीत सत्तावाटपाचा निर्णय?

महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या पक्षांमध्ये अध्यक्षपदावरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. सोमवारी रात्री महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक झाल्याचे समजते. या बैठकीत अध्यक्षपदासाठी सव्वा-सव्वा वर्षांचा कार्यकाळ देण्याचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.

या संभाव्य फॉर्म्युल्यानुसार, गोकुळच्या अध्यक्षपदाची पहिली संधी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे. त्यानंतर भाजप आणि पुढील टप्प्यात शिंदे गटाच्या शिवसेनेला अध्यक्षपद मिळू शकते. उर्वरित कार्यकाळ जनसुराज्य शक्ती पक्षाला देण्याचे गणित आखल्याची चर्चा आहे. म्हणजेच, पाच वर्षांच्या कालावधीत वेगवेगळ्या पक्षांना अध्यक्षपदाची संधी देऊन महायुतीतील सर्व घटकांना सत्तेत वाटा देण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. मात्र, या फॉर्म्युल्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

अध्यक्षपदासाठी कोणाची नावे चर्चेत?

राष्ट्रवादी काँग्रेसला पहिली संधी मिळाल्यास माजी आमदार रणजीत पाटील आणि माजी आमदार राजेश पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. रणजीत पाटील हे माजी आमदार के. पी. पाटील यांचे सुपुत्र आहेत. दुसरीकडे, शिंदे गटाच्या शिवसेनेकडून अजित नरके यांचे नाव चर्चेत आहे. भाजपला अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास डॉ. चेतन नरके यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे.

निवडणुकीसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त

आज सकाळी ११ वाजता गोकुळच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. दोन्ही बाजूंचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात सुमारे ६०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गोकुळच्या अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार, महायुतीतील ठरलेला सत्तावाटपाचा फॉर्म्युला प्रत्यक्षात येणार का आणि समविचारी आघाडी कोणती भूमिका घेणार, याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आजच्या निवडणुकीत गोकुळच्या सत्तेचा फैसला होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!