एकनाथ शिंदेंच्या घातपाताची शक्यता? अजितदादांप्रमाणेच.., शिंदेंच्या पदाधिकाऱ्याच्या वक्तव्याने राज्यात खळबळ

पंढरपूर : पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनादरम्यान घडलेल्या एका घटनेने राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे. शेतकरी कर्जमाफीतील अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी रोहित पवार आंदोलन करत असून या आंदोलनाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने आंदोलनस्थळी हजेरी लावत केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माळशिरस तालुका पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय मगर यांनी आंदोलनस्थळी भेट देत रोहित पवार यांना पाठिंबा दर्शवला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने भूमिका घेणाऱ्या नेत्यांची गरज असल्याचे सांगताना त्यांनी रोहित पवार यांचे कौतुक केले. मात्र, त्यानंतर त्यांनी केलेल्या विधानामुळे उपस्थितांमध्ये एकच चर्चा रंगली.
मगर यांनी सांगितले की, राजकारणात अनेकदा पडद्यामागे अशा घडामोडी घडतात ज्याचा परिणाम मोठ्या नेत्यांच्या राजकीय वाटचालीवर होतो. शेतकरी आणि सामान्य जनतेसाठी लढणारे नेते कमी होत चालले असून अशा नेतृत्वाचे संरक्षण होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतही चिंता व्यक्त केली.

“आज रोहित पवार शेतकऱ्यांसाठी उपोषण करत आहेत. अशा वेळी राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणे आवश्यक आहे. राज्यात यापूर्वी काही महत्त्वाच्या नेत्यांच्या राजकीय प्रवासात अनपेक्षित वळणे आली. त्यामुळे भविष्यातही कोणत्याही नेतृत्वाबाबत अशा घडामोडी घडू शकतात. एकनाथ शिंदे यांच्याबाबतही सावध राहण्याची गरज आहे,” असे सूचक वक्तव्य मगर यांनी केले.

विशेष म्हणजे, सत्ताधारी आघाडीतील पदाधिकारी असतानाही त्यांनी विरोधी पक्षातील आमदाराच्या आंदोलनाला भेट देत समर्थन दिले. त्यामुळे त्यांच्या भूमिकेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे, रोहित पवार यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू असून शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, दत्तात्रय मगर यांच्या विधानानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असून या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.