सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेक प्रकरणाने तापले राजकारण… मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे, पुढे काय घडणार?

जालना : जालना शहरात गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर झालेल्या शाईफेक प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मोठी कारवाई करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाने आता नवे वळण घेतले असून मनसे कार्यकर्त्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

शनिवारी दुपारी जालना शहरातील विशाल कॉर्नर परिसरात ही घटना घडली. गुणरत्न सदावर्ते यांचा दौरा सुरू असताना मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर शाई आणि सुपारी फेकल्याचा आरोप आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात मनसेचे जालना शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. कलम 126(2), 135 महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

पोलिसांच्या या कारवाईनंतर मनसे कार्यकर्त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.

दरम्यान, या घटनेनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. फेकण्यात आलेल्या पदार्थांमध्ये केमिकल असल्याचा दावा करत त्यांनी गंभीर आरोप केले होते. तसेच या घटनेमागे कोणता हेतू होता का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.
त्याचबरोबर सदावर्ते यांनी राज ठाकरे यांनी आपल्यासोबत वैचारिक चर्चा करावी असे आव्हानही दिले होते. या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. मनसेकडून मात्र या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या पोलिस तपास सुरू असून या घटनेमागील नेमका हेतू काय होता, याचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे हे प्रकरण पुढे कोणते वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.