पत्नीच्या मोबाईलमध्ये सापडलं ‘मृत्यूचं प्लॅनिंग’! प्रियकराला दिल्या पतीला अपघातात संपवण्याच्या सूचना; चॅट पाहून पतीच्या पायाखालची जमीन सरकली


तेलंगणा : पत्नीच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम चॅट तपासताना पतीला स्वतःच्या हत्येचा कथित कटच समोर आल्याचा धक्कादायक प्रकार तेलंगणात घडला आहे. पत्नीने तिच्या कथित प्रियकराला पतीला रस्ते अपघातात संपवून ही घटना अपघातासारखी भासवण्याच्या सूचना दिल्याचा गंभीर आरोप पतीने केला आहे. या संभाषणाचे स्क्रीनशॉट पुरावा म्हणून पोलिसांकडे सादर करण्यात आले असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

ही घटना महबुबाबाद जिल्ह्यातील डोर्नकल मंडलातील चिलाकोडु गावात घडल्याचे समोर आले आहे. राजेश्वर राव यांचा २०१६ मध्ये सूर्यापेट जिल्ह्यातील राघवापुरम गावातील भवानीसोबत विवाह झाला. या दाम्पत्याला दोन मुले असून, राजेश्वर राव खम्मममधील एका खासगी रुग्णालयात काम करतात.

राजेश्वर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पत्नीचे सैदुलु नावाच्या कुरिअर डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हसोबत कथित विवाहबाह्य संबंध होते. २७ जून रोजी दुपारी जेवणासाठी ते अचानक घरी पोहोचले असता भवानी आणि सैदुलु आक्षेपार्ह अवस्थेत दिसले, असा दावा त्यांनी केला. यानंतर पत्नीच्या कथित संबंधांचा प्रकार त्यांच्या लक्षात आला.

या घटनेनंतर गावात पंचायत बोलावण्यात आली. २८ जुलै रोजी मोठ्या भावाला पंचायत बैठकीसाठी घेऊन जाण्यासाठी राजेश्वर घराबाहेर पडले असताना सैदुलुने त्यांचा पाठलाग केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्या वेळी आपण कसाबसा बचावलो, असे राजेश्वर यांनी सांगितले.

या प्रकारामुळे संशय वाढल्यानंतर राजेश्वर यांनी पत्नीचा मोबाईल तपासला. त्यावेळी व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामवरील कथित चॅट त्यांच्या हाती लागले. त्यामध्ये भवानीने सैदुलुला पतीला घराबाहेर संपवण्यास आणि रस्ते अपघात घडवून त्याचा काटा काढण्यास सांगितल्याचा दावा राजेश्वर यांनी केला आहे. तसेच पतीला संपवले नाही तर आपण जीव देऊ, अशा आशयाचा मेसेजही असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाईलमधील हे संभाषण पाहिल्यानंतर राजेश्वर यांनी चॅटचे स्क्रीनशॉट घेतले. १ ऑगस्ट रोजी त्यांनी पत्नी भवानी आणि सैदुलुविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीत आपल्या जीवाला धोका असल्याचे नमूद करून कथित हत्येच्या कटाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

मात्र, तक्रार दाखल करूनही अद्याप पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचा दावा राजेश्वर यांनी केला आहे. पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराविरोधातील आरोप, मोबाईलमधील चॅट आणि पाठलाग केल्याचा दावा या सर्व बाबींची चौकशी झाल्यानंतरच या कथित हत्येच्या कटामागील सत्य स्पष्ट होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!