सिल्व्हर ओकवरील भेटीनंतर राजकारण तापलं! तटकरे- पटेल ‘२२ आमदार घेऊन भाजपामधून लढणार’; रोहित पवारांचा मोठा दावा

मुंबई : तटकरे यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट अजून चर्चेत असतानाच आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. “सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे २२ आमदार घेऊन भाजपामधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत,” असा मोठा दावा रोहित पवार यांनी केला आहे. या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीपासून महायुतीपर्यंत सर्वच राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार म्हणाले, “तटकरे आणि प्रफुल पटेल हे २२ आमदारांसह भाजपामधून लढणार आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील काही आमदारदेखील त्यांच्या संपर्कात आहेत.” मावळ मतदारसंघातील आमदारही भाजपामधून निवडणूक लढवतील, असा दावाही त्यांनी केला.
यावेळी रोहित पवार यांनी सुनिल तटकरे यांच्यावर मिश्कील टोला लगावत, “तटकरे यांना सिल्व्हर ओकवरील चहा आवडत असेल,” असे म्हटले.

दरम्यान, काल सुनिल तटकरे यांनी मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली होती. काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार यांच्यावर ब्रीचकँडी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. रुग्णालयातून घरी परतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, “ही केवळ सदिच्छा भेट होती. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.” तसेच शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दीर्घकाळ काम करण्याची संधी मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.
मात्र, या भेटीनंतर रोहित पवार यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.