संभाजीनगरमध्ये ‘निदा खान’ प्रकरणाने राजकारणात भूकंप… MIM विरुद्ध शिवसेना-भाजप संघर्ष तीव्र, आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये अचानक पेटलेल्या एका प्रकरणाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. नारेगाव परिसरातील कारवाईनंतर उघड झालेल्या ‘निदा खान’ प्रकरणाने आता केवळ गुन्हेगारी तपासापुरते मर्यादित न राहता थेट राजकीय रणसंग्रामाचे रूप घेतले आहे. एका बाजूला एमआयएम, तर दुसऱ्या बाजूला शिवसेना-भाजप असा संघर्ष उभा राहिल्याने शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

माहितीनुसार, टीसीएस आयटी कंपनीची माजी कर्मचारी असलेल्या निदा खानला पोलिसांनी संयुक्त कारवाईत अटक केली. नारेगाव परिसरातील एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरातून ही कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. यानंतर एमआयएमने निदा खानच्या समर्थनार्थ भूमिका घेतल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
या घटनेनंतर शिवसेना-भाजपने एमआयएमवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी थेट आरोप करत शहरातील महिला आणि मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये एमआयएमचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या विधानामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, मतीन पटेल यांच्या घरावर आणि कार्यालयावर महापालिकेकडून अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना तीन दिवसांत स्पष्टीकरण देण्याची संधी देण्यात आली असून चौथ्या दिवशी कारवाई करून बांधकाम पाडण्यात येईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

तसेच महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४७ अंतर्गत एखाद्या नगरसेवकाच्या कुटुंबीयांनीही अनधिकृत बांधकाम केल्यास त्याचे पद धोक्यात येऊ शकते, असा दावा राजकीय नेत्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे मतीन पटेल यांच्या नगरसेवक पदावरही गंभीर संकट निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे.
या संपूर्ण प्रकरणात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी निदा खानच्या समर्थनात भूमिका घेतल्याने वाद अधिकच वाढला आहे. तर दुसरीकडे, भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने एमआयएमवर गंभीर आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, काही नेत्यांनी एमआयएमच्या काही नगरसेवकांवर गंभीर गुन्ह्यांचे आरोप करत पक्षावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या आरोपांमध्ये ड्रग माफिया कनेक्शन, ब्लॅकमेलिंगचे आरोप आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उल्लेख करण्यात आला आहे.
या सर्व घडामोडींमुळे निदा खान प्रकरण आता फक्त कायदेशीर तपासापुरते मर्यादित न राहता पूर्णपणे राजकीय वादात रूपांतरित झाले आहे. शहरात तणावपूर्ण वातावरण असून पुढील काही दिवसांत या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष आता या तपास आणि राजकीय घडामोडींवर केंद्रित झाले आहे.