महाराष्ट्रात पुन्हा राजकीय रणधुमाळीची चाहूल! ‘या’ नगरपरिषदांमध्ये कोण मारणार बाजी? निवडणूक कार्यक्रम जाहीर


महाराष्ट्रात पुन्हा एकदा स्थानिक राजकारणाचा धुरळा उडणार आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील विविध नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच गावागावात राजकीय चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. कुठं इच्छुकांची धावपळ सुरू झालीये, तर कुठं पक्षांतर्गत गाठीभेटींना वेग आला आहे. “यंदा तिकीट कुणाला?” आणि “कोणाची खुर्ची जाणार?” याचीच चर्चा सध्या चौकाचौकात रंगताना दिसत आहे.

या निवडणुकांमध्ये सर्वाधिक लक्ष लागलं आहे ते अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे. इथे थेट अध्यक्षपदासह तब्बल २० सदस्य पदांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे पातूरमध्ये आता राजकीय रिंगण चांगलंच तापणार असल्याचं चित्र दिसत आहे. स्थानिक पातळीवर अनेक इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली असून काही ठिकाणी गुप्त बैठका आणि रणनीती आखण्याचं कामही सुरू झालं आहे.

फक्त पातूरच नाही तर उमेदवारांच्या निधनामुळे स्थगित करण्यात आलेल्या काही प्रभागांमध्येही आता मतदान होणार आहे. मनमाड, पिंपळनेर, गेवराई आणि अकोट येथील प्रत्येकी एका प्रभागासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या जागांवर कोण बाजी मारणार याकडे स्थानिक राजकीय नेत्यांचं लक्ष लागलं आहे.

याशिवाय राज्यातील ११ जिल्ह्यांमधील १४ नगरपंचायतींतील १५ रिक्त जागांसाठी आणि ३ नगरपरिषदांमधील ३ रिक्त जागांसाठीही पोटनिवडणुका होणार आहेत. एकूण १४ जिल्ह्यांतील ८ नगरपरिषदा आणि १४ नगरपंचायतींमधील तब्बल ४७ रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी स्थानिक सत्तेची गणितं बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक

निवडणूक कार्यक्रम जाहीर : १२ मे २०२६

उमेदवारी अर्ज दाखल : १८ मे ते २५ मे २०२६

अर्जांची छाननी : २६ मे

अर्ज मागे घेण्याची मुदत : २७ मे ते २ जून

मतदान : २० जून २०२६

(सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०)

मतमोजणी आणि निकाल : २१ जून २०२६

दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित भागांमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी सुरू केली असून गावपातळीवर बैठका, संपर्क मोहिमा आणि गाठीभेटींना जोर आला आहे. अनेक ठिकाणी बंडखोरीचीही कुजबुज सुरू असून तिकीट वाटपात मोठे ट्विस्ट पाहायला मिळू शकतात. त्यामुळे येत्या काही दिवसांत स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!