पुण्यात मध्यरात्री ‘हाय-प्रोफाईल’ रेव्ह पार्टीवर पोलिसांचा धडक छापा; 100 हून अधिक तरुण-तरुणी ताब्यात, अल्पवयीनांचाही सहभाग?


पुणे : डीजेच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात नाच, मद्याच्या बाटल्यांचा खच, नशेच्या धुंदीत बुडालेले तरुण-तरुणी आणि बाहेरून बंद असलेला आलिशान बंगला… पुणे जिल्ह्यातील तुळापूर येथे मध्यरात्री सुरू असलेल्या अशाच एका कथित हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला. या कारवाईत 100 हून अधिक तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून, काही अल्पवयीनांचा सहभाग असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.

लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूर परिसरातील एका आलिशान बंगल्यात मोठ्या प्रमाणात पार्टी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकत संपूर्ण परिसर ताब्यात घेतला. पोलिसांचे पथक आत दाखल झाले तेव्हा अनेक जण मद्य आणि इतर नशेच्या पदार्थांच्या प्रभावाखाली असल्याचे दिसून आले.

या कारवाईबाबत अप्पर पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते यांनी सांगितले की, संबंधित आयोजकांकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी रात्री 11.30 वाजेपर्यंतच होती. मात्र, परवानगीची मुदत संपल्यानंतरही पार्टी सुरू ठेवण्यात आली. त्यामुळे विविध नियमांचे उल्लंघन झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे.

घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात मद्यसाठा, गांजा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यातील काही युवकांचे वय 21 वर्षांपेक्षा कमी असल्याची शक्यता असून, अल्पवयीनांना मद्य पुरवण्यात आले का, याचाही तपास सुरू आहे.

याशिवाय हा बंगला उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तीची भूमिका, पार्टीचे आर्थिक व्यवहार, आयोजकांचे नेटवर्क आणि सहभागी तरुण-तरुणी कोणत्या भागातून आले होते, याचीही चौकशी सुरू आहे. पोलिसांकडून संबंधितांवर विविध कायद्यांअंतर्गत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, तपास पुढे सरकत असताना आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुण्यात गेल्या काही महिन्यांत रेव्ह पार्टींचे वाढते प्रमाण आणि त्यातून समोर येणारे ड्रग्ज कनेक्शन चिंतेचा विषय ठरत असताना, तुळापूरमधील ही कारवाई शहरातील बेकायदेशीर पार्टी रॅकेटवर मोठा घाव मानली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!