नागपूर हिंसाचारात जखमी पोलीस उपयुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला, मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉलवरून साधला संवाद..

नागपूर : नागपूर शहरामध्ये काल सोमवार (ता.१७) दोन गटात संघर्ष झाल्यामुळे महालमधील झेंडा चौकात तणाव निर्माण झाला होता. एका गटातील युवकांनी पोलिसांवर आणि घरांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनीही त्या गटावर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवला.
ही घटना काल सोमवार (ता.१७) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेचा परिणाम आज शहरात दिसून येत आहे. शहराच्या अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.अनेकांची वाहने अज्ञातांनी फोडली, त्याचबरोबर काहींच्या गाड्यांना आग लावून पेटवून दिली.
या घटनेत तीन पोलीस उपायुक्तांसह ४० पेक्षा अधिक पोलीस जखमी झाले आहेत. यामध्ये जमावाने पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीने वार केला. रक्तबंबाळ झालेल्या कदम यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
दरम्यान, आज (ता.१८) मार्च मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉलद्वारे पोलीस उपायुक्त कदम यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंट पोलिस उपायुक्त कदम यांच्यासोबतचा व्हिडीओ कॉलचा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच, फडणवीस यांनी लवकर बरे होण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, सोमवारी संध्याकाळच्या सुमारास महाल परिसरात दोन गटांमध्ये औरंगजेबच्या कबरीच्या वादावरून तणाव निर्माण झाला. काही वेळातच वाद विकोपाला गेला आणि जमावाने दगडफेक सुरू केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, संतप्त जमावाने पोलिसांवरही हल्ला चढवत जाळपोळ सुरू केली.