बोपगावात तंबाखू माफियांवर पोलिसांचा मोठा घाव; २१.७० लाखांचा प्रतिबंधित माल आणि दोन वाहने जप्त


सासवड | दि. २५ जून : पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथे सुरू असलेल्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध साठ्यावर सासवड पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल २१ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील बेकायदा तंबाखू व्यापारावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, बोपगाव येथील एका गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ साठवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सासवड पोलिसांच्या पथकाने गुरुवारी दुपारी संबंधित ठिकाणी छापा टाकला. तपासणीदरम्यान गोडाऊनमध्ये विविध नामांकित कंपन्यांच्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला.

कारवाईदरम्यान दोन पिकअप वाहनांमध्ये हा माल वाहतुकीसाठी तयार ठेवण्यात आल्याचेही उघड झाले. पोलिसांनी तंबाखूजन्य पदार्थांसह माल वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी एमएच १२ जीटी ६६३६ आणि एमएच १२ एक्सएम ९५४८ क्रमांकाची दोन पिकअप वाहने जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या मालासह वाहनांची एकूण किंमत सुमारे २१ लाख ७० हजार रुपये असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असून उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा पुरवठा कुठून होत होता आणि त्याचे वितरण कोणत्या भागात केले जात होते, याचा तपास पोलीस करत आहेत.

सासवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष घोळवे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना, जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध तंबाखू व्यवसायाविरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगितले. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर आणि पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक अर्चना पाटील तसेच पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. या धाडसी कारवाईमुळे पुरंदर तालुक्यातील अवैध तंबाखू व्यवसायात खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!