Breaking! पल्स कंपनीच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार चंद्रकांत सांगलीकरच्या पोलीस कोठडीत वाढ; गुंतवणूकदारांच्या पैशांतून करोड्यांच्या जमीनी घेऊन परस्पर विक्री…


पिंपरी-चिंचवड : PACL कंपनीच्या गाजलेल्या गुंतवणूक घोटाळ्यातील मुख्य आरोपी चंद्रकांत रामचंद्र सांगलीकर याची पोलीस कोठडी न्यायालयाने 10 जानेवारीपर्यंत वाढवली आहे. पुण्यातील प्रथमवर्ग न्यायालयाने हा आदेश दिला असून, सध्या आरोपी तीन दिवस पोलिस कोठडीत आहे.

या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने PACL कंपनीची जमीन विक्री करण्यास बंदी घातलेली असतानाही, 2015 ते 2020 या काळात बनावट कागदपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणावर जमीन विक्री केल्याचा गंभीर आरोप आरोपीवर आहे. ही विक्री सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचे उल्लंघन करून केल्याचं तपासात समोर आलं आहे.

पोलीस तपासात असं आढळून आलं आहे की, आरोपी चंद्रकांत सांगलीकर हा 2005 पासून PACL कंपनीसाठी प्रॉपर्टी ब्रोकर म्हणून काम करत होता. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये कंपनीसाठी जमीन खरेदी करत असतानाच, त्याने कंपनीचीच फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. कंपनीच्या पैशातून स्वतःच्या नावाने वेगवेगळ्या कंपन्या काढून, त्या कंपन्यांच्या नावावर जमीन घेतल्याचाही आरोप आहे.

PACL गुंतवणूकदारांच्या पैशातून आरोपीने सांगली, पंजाब आणि इतर ठिकाणी विविध व्यवसाय उभे केल्याचंही तपासात निष्पन्न झालं आहे. 2005 पूर्वी आरोपीकडे काहीच नव्हतं, मात्र आज तो हजारो कोटींचा मालक बनून जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप गुंतवणूकदार संघटनांनी केला आहे.

हा संपूर्ण घोटाळा पल्स पीपल्स वेल्फेअर असोसिएशन या संघटनेने उघडकीस आणला. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बावधन पोलीस ठाणे आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. तपासात पुण्यातील सुस परिसरातील जमीन विक्रीतून तब्बल 28 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं स्पष्ट झालं. तसेच वाघोली आणि बेंगळुरू येथेही अशाच पद्धतीने बनावट कागदपत्रांद्वारे जमीन विक्री केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

या प्रकरणात आरोपीविरोधात फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करणे, कट रचणे अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्याने PACL कंपनीच्या नावावर असलेली गुंतवणूकदारांच्या पैशातून घेतलेली जमीन बेकायदेशीररीत्या विकून अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

सरकारी वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद करत आरोपीला जास्तीत जास्त पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. हे सर्व मुद्दे लक्षात घेत न्यायालयाने आरोपी चंद्रकांत रामचंद्र सांगलीकर याला 10 जानेवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असून, आणखी मोठी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!