PMPML चे बस चालकांसाठी कडक नवे नियम; बस चोरीनंतर प्रशासनाचा मोठा निर्णय…

पुणे : पुणे शहरातील सार्वजनिक प्रवास अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी पीएमपी प्रशासनाने कठोर निर्णय घेतले आहेत. डेंगळे पूल परिसरातून बस चोरीला गेल्याची घटना आणि वाढते अपघात लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत.

यापुढे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किंवा कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर केवळ विभागीय चौकशीच नाही, तर थेट पोलीस कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
नव्या नियमांनुसार, चालकाने बस उभी करताना इंजिन सुरू ठेवण्यास पूर्ण बंदी असेल. बस थांबवल्यानंतर इंजिन बंद करून चावी स्वतःकडे ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच बस केवळ अधिकृत आणि सुरक्षित वाहनतळावरच पार्क करावी लागणार असून, पार्किंगनंतर बसचे सर्व दरवाजे नीट बंद आहेत याची खात्री चालक आणि वाहक दोघांनीही करावी लागेल.

डेंगळे पूल परिसरात बसमध्ये चावी सोडून निष्काळजीपणा करणाऱ्या चालकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून संबंधित ठेकेदाराला त्याची सेवा कायमची संपुष्टात आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, बस पळवून नेणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू आहे.

प्रशासनाने व्यसनाधीनतेबाबतही शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली आहे. ड्युटीवर मद्यपान किंवा अमली पदार्थांचे सेवन आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्याची नोकरी तात्काळ संपवली जाईल. तसेच वेगमर्यादा ओलांडल्यास मोठा दंड आकारला जाणार आहे.
पीएमपी ताफ्यातील खासगी बस ठेकेदारांना हे सर्व नियम लागू करण्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली असून त्यानंतर अंमलबजावणीचा अहवाल सादर करणे बंधनकारक असेल. प्रवाशांची सुरक्षा हीच सर्वोच्च प्राधान्य असल्याचे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.