पंतप्रधान मोदींचा नवा VIDEO चर्चेत; सोनं खरेदीबाबत नागरिकांना केलं मोठं आवाहन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाने ७.८ टक्के विकास दर नोंदवल्याबद्दल देशवासीयांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत भारताच्या आर्थिक प्रगतीचा उल्लेख केला.
जगभरात युद्धजन्य परिस्थिती, आर्थिक आव्हाने आणि पुरवठा साखळीतील अडथळे असतानाही भारत वेगाने प्रगती करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी नागरिकांना स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करत परदेश प्रवास आणि सोन्याच्या खरेदीबाबतही महत्त्वाचे भाष्य केले.

७.८ टक्के विकास दरावर मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशवासीयांचे मनःपूर्वक अभिनंदन. भारताने ७.८ टक्के विकास दर गाठला असून ही देशासाठी आनंदाची बाब आहे. नागरिकांच्या दृढनिश्चय आणि मेहनतीमुळे हे यश मिळाले आहे. जग सध्या युद्ध आणि विविध संकटांनी वेढलेले आहे. पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे आणि कोविडनंतरच्या काळातही जागतिक अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने कायम आहेत. अशा परिस्थितीतही भारत वेगाने पुढे जात असल्याचे मोदी यांनी सांगितले.


विरोधकांवरही निशाणा
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवरही टीका केली. देशात काही जण निराशेच्या गर्तेत अडकून खोट्या गोष्टी पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. भारताने सर्व आव्हानांवर मात करत ७.८ टक्के विकास दर गाठला आहे. ही विकासाची गती कायम ठेवणे गरजेचे असून त्यासाठी आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट महत्त्वाचे असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.
परदेश प्रवास आणि सोन्याच्या खरेदीबाबत आवाहन
स्वदेशी आणि स्थानिक वस्तूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करत पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना अनावश्यक परदेश प्रवास टाळण्यास सांगितले. लग्नासाठी परदेशात जाण्याऐवजी देशातच विवाह सोहळे आयोजित करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच अत्यावश्यक नसल्यास सोने खरेदी करणेही टाळावे, असे त्यांनी म्हटले.
स्वदेशीवर जितका अधिक भर दिला जाईल, तितकी आत्मनिर्भरतेला चालना मिळेल, असा संदेश मोदी यांनी दिला.
विकसित भारताचा संकल्प
भारताच्या स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होतील, तेव्हा देशाची तरुण पिढी विकसित भारतात जगत असेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. देशाच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान देण्याचे आवाहन करत त्यांनी १.४ अब्ज भारतीयांची शक्ती देशाला नव्या उंचीवर घेऊन जाईल, असे म्हटले. देशाच्या विकासाचा हा वेग कायम ठेवण्यासाठी सर्वांनी संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी केले.