‘शिंदेंना मराठे जाब विचारतील…’; जरांगेंचा संताप अनावर, 58 लाख नोंदींच्या मुद्द्यावर थेट इशारा!

जालना : मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा तापला असून मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी 58 लाख कुणबी नोंदींचा मुद्दा उपस्थित करत सरकारकडे स्पष्ट उत्तर मागितलं आहे. या नोंदी प्रत्यक्षात सापडल्या असतील तर त्या मान्य करा, अन्यथा त्या सापडलेल्या नाहीत हे स्पष्टपणे सांगा, अशी मागणी त्यांनी केली.
जरांगे पाटील यांनी शिंदे यांच्यावर टीका करताना मराठा समाजाच्या भावनांचा दाखला दिला. नोंदी कमी केल्या जात असल्याचं समाजाला वाटलं तर त्याचा जाब एकनाथ शिंदे यांना द्यावा लागेल, असं त्यांनी म्हटलं. पक्षाच्या राजकारणात जशी गद्दारी झाली, तशी मराठा समाजासोबत का केली, असा सवाल समाज शिंदेंना विचारेल, अशी तीव्र प्रतिक्रिया जरांगेंनी दिली.

शिंदे यांच्या परभणी दौऱ्यावरूनही जरांगे यांनी वेगळा दावा केला आहे. त्यांच्यानुसार, शिंदेंचा परभणी दौरा आधी रद्द करण्यात आला होता. मात्र, जरांगे यांनी दौऱ्याला विरोध केला नसल्याचा संदेश मिळाल्यानंतर काही वेळातच दौरा पुन्हा निश्चित झाला. आपण त्या दौऱ्याला विरोध केला असता तर शिंदे यांच्यासाठी परिस्थिती अधिक कठीण झाली असती, असं जरांगे म्हणाले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची चर्चेची दारं खुली असल्याचं म्हटलं आहे. मात्र, या भूमिकेवर जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली. सरकारकडे चर्चेसाठी जाण्याची मागणी आम्ही केलेली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. संविधानाच्या नावावर सरकारच्या भूमिकेवर टीका करताना सत्ताधारी पक्षातील नेत्यांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
याआधी शिंदे यांच्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचा उल्लेख करत जरांगेंनी त्यांच्या राजकीय प्रभावावरही भाष्य केलं. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर विरोधी भूमिका घेतल्यानंतर राजकीय परिस्थिती बदलल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करत मराठा समाजाला मुंबईकडे येण्याचं आवाहन केलं आहे. 12 सप्टेंबरपर्यंत मुंबईत दाखल होण्याचा संदेश त्यांनी समाजाला दिला आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार आणि जरांगे यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आता 58 लाख नोंदींच्या दाव्यावर सरकार काय उत्तर देतं आणि एकनाथ शिंदे जरांगेंच्या आरोपांना कसं प्रत्युत्तर देतात, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.