महिन्याच्या सुरुवातीलाच मोठा झटका! व्यावसायिक LPG सिलेंडर महागला; नव्या किमती जाहीर

मुंबई : महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. सरकारी तेल विपणन कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम यांनी १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत वाढ केली आहे. मात्र, १४.२ किलोच्या घरगुती LPG सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
नवीन दरानुसार, दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत २७३८ रुपयांवरून २७४७.५० रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईत हा सिलेंडर आता २७०१ रुपयांना मिळणार असून, आधीच्या २६९१ रुपयांच्या तुलनेत १० रुपयांची वाढ झाली आहे. चेन्नईमध्येही सिलेंडरच्या दरात १०.५० रुपयांची वाढ झाली असून, नवीन किंमत २९१६.५० रुपये झाली आहे.

१९ किलोचे व्यावसायिक सिलेंडर प्रामुख्याने हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, केटरिंग व्यवसाय आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये वापरले जातात. त्यामुळे या दरवाढीचा परिणाम खाद्यपदार्थांच्या किमतीवरही होण्याची शक्यता असते.


ऑगस्टमध्ये झाली होती मोठी कपात
याआधी १ ऑगस्ट २०२६ रोजी व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली होती. त्यावेळी दिल्लीतील सिलेंडरची किंमत २९३० रुपयांवरून थेट २७३८ रुपयांवर आली होती. त्यापूर्वी १ जुलै रोजीही १९ किलोच्या सिलेंडरच्या दरात १८३.५० रुपयांची कपात करण्यात आली होती.
वर्षभरात दरात मोठे चढ-उतार
२०२६ मध्ये १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. जानेवारीत दिल्लीतील किंमत १६९१.५० रुपये होती. त्यानंतर फेब्रुवारीत १७४०.५० रुपये, मार्चमध्ये १७६८.५० रुपये आणि ७ मार्चला १८८३ रुपये झाली. एप्रिलमध्ये ती २०७८.५० रुपयांवर पोहोचली.
मे महिन्यात सिलेंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ झाल्याने दिल्लीतील किंमत ३०७१.५० रुपयांवर पोहोचली होती. त्यानंतर जूनमध्ये ४२ रुपयांची वाढ झाली. मात्र, जुलै आणि ऑगस्टमध्ये दरात अनुक्रमे १८३.५० रुपये आणि १९२ रुपयांची कपात करण्यात आली होती. आता सप्टेंबरमध्ये पुन्हा दर वाढवण्यात आले आहेत.
घरगुती LPG सिलेंडरचे दर जैसे थे
दरम्यान, घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या LPG सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या दिल्लीत विनाअनुदानित घरगुती LPG सिलेंडरची किंमत ९४२ रुपये आहे. कोलकात्यात ९६८ रुपये, मुंबईत ९४१.५० रुपये, तर चेन्नईमध्ये ९५७.५० रुपये दर आहे.
घरगुती LPG सिलेंडरच्या दरात शेवटचा बदल ७ जून २०२६ रोजी झाला होता. त्यामुळे व्यावसायिक सिलेंडर महागला असला तरी सर्वसामान्यांच्या घरगुती गॅसच्या खर्चात सध्या कोणतीही वाढ झालेली नाही.