PM मोदींच्या आवाहनामुळे चिंता वाढली! कोट्यवधी नोकऱ्यांवर संकटाची शक्यता; GJC कडून गंभीर अंदाज जाहीर


नवी दिल्ली : पुढील एका वर्षासाठी देशातील नागरिकांनी सोन्याची खरेदी टाळावी, तसेच पेट्रोल-डिझेलचा वापर शक्य तितका कमी करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय, शाळांनी शक्य असेल त्या ठिकाणी ऑनलाइन वर्गांना प्राधान्य द्यावे आणि ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीचा अधिकाधिक अवलंब करावा, असेही त्यांनी सुचवल्याचे सांगितले जात आहे.

सलग दोन दिवस विविध कार्यक्रमांमध्ये केलेल्या या विधानांमुळे आर्थिक आणि व्यापारी क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. वाढत्या आयात खर्चामुळे परकीय चलन साठ्यावर दबाव निर्माण होत असल्याने सरकारकडून खर्चकपातीचा संदेश दिला जात असल्याचे अर्थतज्ज्ञांकडून मानले जात आहे. भारत मोठ्या प्रमाणात तेल, नैसर्गिक वायू, सोने आणि खतांची आयात करतो.

या सर्व व्यवहारांसाठी डॉलरमध्ये देयके करावी लागतात. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे डॉलरवरील खर्च आणखी वाढत असून, त्यामुळे रुपयावरही दबाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अनावश्यक खर्च कमी करून परकीय चलन वाचवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, सोन्याच्या खरेदीबाबतच्या या आवाहनानंतर सराफा बाजारात अस्वस्थता पसरली आहे. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात कमी झाल्यास उद्योगाला मोठा फटका बसू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलने या विधानावर चिंता व्यक्त केली असून उद्योगावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, असे म्हटले आहे.

उद्योग संघटनांच्या मते, सोन्याची खरेदी कमी झाल्यास लाखो लोकांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. देशातील ज्वेलरी उद्योगाची वार्षिक उलाढाल सुमारे १० लाख कोटी रुपयांच्या आसपास आहे. मात्र, मागणीत सुमारे ३० टक्क्यांपर्यंत घट झाल्यास तब्बल ३ लाख कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित संघटनेचे प्रतिनिधी पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मध्य पूर्वेत इराण आणि अमेरिका यांच्यात सध्या तात्पुरता युद्धविराम असला तरी होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील तणाव कायम आहे. यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढताना दिसत आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सुमारे ३.३० टक्क्यांनी वाढ झाली असून, दर प्रति बॅरल १०४ डॉलरच्या पुढे गेला आहे. अमेरिकेतही तेलाच्या किमती जवळपास ३ टक्क्यांनी वाढल्या असून तिथे दर ९८ डॉलर प्रति बॅरलच्या वर पोहोचला आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!