गुन्हेगारांसाठी ‘नो एंट्री’ची तयारी! पुण्यात १३५ नव्या पोलीस चौक्यांचा आराखडा, प्रत्येक भागात वाढणार पोलिसांची नजर

पुणे : पुणे शहराची वाढती व्याप्ती आणि वाढणाऱ्या लोकसंख्येसोबत सुरक्षा व्यवस्थेवरही ताण वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील पोलिस यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी मोठी योजना आखण्यात आली आहे. आगामी काळात पुण्यात सुमारे १३५ नवीन पोलीस चौक्या सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून त्याला लवकरच गृह विभागाची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

शहरात आयटी हब, नव्या टाउनशिप आणि वेगाने विकसित होणाऱ्या उपनगरांमुळे अनेक भागांमध्ये नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र काही ठिकाणी पोलिसांची स्थानिक उपस्थिती मर्यादित असल्याने तक्रारींचे निवारण आणि तातडीची मदत पोहोचवताना अडचणी येत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे.
सध्या पुण्यात ४५ पोलीस ठाणी आणि ११० चौक्या कार्यरत आहेत. तरीही अनेक पोलीस ठाण्यांच्या हद्दी विस्तीर्ण असल्याने प्रत्येक भागावर प्रभावी नियंत्रण ठेवणे आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत किमान तीन चौक्या असाव्यात, या उद्देशाने नव्या चौक्यांचे नियोजन सुरू आहे.

गेल्या वर्षी मंजूर झालेली मांजरी, नऱ्हे, लोहगाव, लक्ष्मीनगर आणि येवलेवाडी येथील नवीन पोलीस ठाणी कार्यान्वित झाल्यानंतर आता पुढील टप्प्यात स्थानिक चौक्यांचे जाळे मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.

या निर्णयामुळे नागरिकांना किरकोळ तक्रारींसाठी दूरच्या पोलीस ठाण्यात जाण्याची गरज कमी होईल. परिसरातील गस्त वाढेल, आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांचा प्रतिसाद अधिक जलद मिळेल आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे सोपे होईल. विशेषतः महिला सुरक्षा, वाहतूक नियंत्रण आणि रात्रीच्या गस्तीला मोठे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पोलिस प्रशासनाने प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया सुरू केली असून मंजुरीनंतर शहरातील विविध भागांमध्ये टप्प्याटप्प्याने नव्या चौक्या सुरू केल्या जाणार आहेत. पुण्याच्या वाढत्या सुरक्षेच्या गरजा लक्षात घेता हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.