पान मसाला खाऊन रस्त्यावर थुंकणाऱ्या व्यक्तींचे फोटो आता वर्तमान पत्रात छापणार, नितीन गडकरी यांचे मोठं वक्तव्य…

मुंबई : पान मसाला खाऊन रस्त्यावर थुंकणा-यांची आता खैर नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाची सूचना केली आहे. पान मसाला खाल्ल्यानंतर रस्त्यावर थुंकणाऱ्यांची छायाचित्रे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावीत, असे गडकरी म्हणाले. गडकरी बुधवारी नागपुरात स्वच्छ भारत अभियानानिमित्त एका कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी पान मसाला खाऊन रस्त्यावर थुंकणा-या लोकांची छायाचित्रे क्लिक करून वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावीत, अशी सूचना केली आहे.
नागपुरात आयोजित स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की, पूर्वी मी माझ्या गाडीतून चॉकलेटचे रॅपर फेकत असे. आज मी जेव्हा चॉकलेट खातो तेव्हा त्याचे रॅपर घरी घेऊन डस्टबीन मध्ये टाकतो.
केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, लोक खूप हुशार आहेत. चॉकलेट खाल्ल्यानंतर ते लगेच त्याचे रॅपर फेकून देतात. मात्र, परदेशात गेल्यावर चॉकलेट खाल्ल्यानंतर ते चॉकलेटचे कव्हर खिशात ठेवतात. परदेशात त्याची वागणूक चांगली आहे.
दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित करत गडकरी म्हणाले की, लोक पान मसाला खातात आणि रस्त्यावर थुंकतात, याचे फोटो काढून ते वृत्तपत्रात प्रसिद्ध केले पाहिजेत. महात्मा गांधींनी असे प्रयोग केले होते, असा दावा त्यांनी केला.