मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी! पेट्रोल 5 रुपये स्वस्त; राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मनसेचा विशेष उपक्रम


मुंबई : मध्य पूर्वेत अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक बाजारात इंधन दरांवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. या परिस्थितीत पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता असताना मुंबईकरांसाठी आज दिलासादायक बातमी समोर आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मुंबईतील नागरिकांसाठी एक विशेष उपक्रम राबवत पेट्रोलच्या दरात 5 रुपये प्रति लिटर सवलत जाहीर केली आहे. हा उपक्रम फक्त दुचाकीस्वारांसाठी लागू असून मुंबईतील 36 पेट्रोल पंपांवर आज एक दिवसासाठी ही सवलत देण्यात येत आहे.

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा देण्याचा उद्देश असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे आणि विभाग अध्यक्ष जय शृंगारपुरे यांनी या उपक्रमाबाबत माहिती देताना केंद्र सरकारवर टीका केली. सध्याच्या जागतिक परिस्थितीत डॉलरचे दर वाढत असून त्याचा थेट परिणाम इंधन दरांवर होत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारकडून सबसिडी देण्याची गरज होती, मात्र तसे न झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

जय शृंगारपुरे यांनी म्हटले की, “देशात महागाई वाढत असून पेट्रोलचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे आम्ही जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहोत.” तर संदीप देशपांडे यांनी सरकारच्या धोरणांवर टीका करत जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे म्हटले.

या उपक्रमांतर्गत मुंबईतील निवडक 36 पेट्रोल पंपांवर दुचाकीस्वारांना प्रति लिटर 5 रुपयांची सवलत देण्यात येत आहे. मात्र ही सवलत फक्त आजच्या दिवसापुरती मर्यादित असल्याने अनेक पेट्रोल पंपांवर सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळत आहे.

या निर्णयामुळे मुंबईकरांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून काही नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे, तर काहींनी हा केवळ प्रतीकात्मक उपक्रम असल्याचे मत व्यक्त केले आहे. महागाईच्या काळात असा दिलासा महत्त्वाचा असला तरी दीर्घकालीन उपायांची गरज असल्याचेही मत व्यक्त होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!