पार्टटाईम जॉब शोधताय.? आधी खात्री करा, पार्टटाईम जॉब देण्याच्या बहाण्याने ९ जणांची २५ लाखांची फसवणूक, खराडी येथील घटना..

पुणे : पार्ट टाईम जॉब देण्याच्या बहाण्याने ९ जणांना ऑनलाईन टास्क पूर्ण करण्यास सांगून २५ लाख ६५ हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १७ जानेवारी २०२३ ते २४ एप्रिल २०२३ या कालावधीत घडली आहे.
याप्रकरणी खराडी येथील ३६ वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता.२५) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोबाईल क्रमांक धारक, टेलीग्राम आयडी धारक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्यासह इतर ८ जणांची फसवणूक केली असून त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केले आहेत.
मिळलेल्या माहिती नुसार, सायबर गुन्हेगारांनी फिर्यादी यांच्याशी संपर्क साधून पार्ट टाईम जॉब असल्याचे सांगितले. पार्ट टाईम जॉब करता यूट्यूब चॅनल सबस्क्राईब, लाईक करण्यास सांगितले. यानंतर वेगवेगळे टास्क पूर्ण केल्यानंतर चांगला परतावा मिळेल, असे सांगून टेलिग्राम आयडी देऊन त्यांना जॉईन होण्यास सांगितले.
सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास सांगून फिर्यादी यांच्यासह इतर ८ जणांकडून २५ लाख ६५ हजार २०४रुपये उकळले.
दरम्यान, काही कालावधीनंतर परतावा मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे करीत आहेत.