ऐन होळीत प्रवाशांचे होणार हाल, एसटी कर्मचारी जाणार संपावर, नेमकं कारण काय?

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध आर्थिक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी बुधवारी राज्यभरात एसटी आगार विभागाच्या मुख्य ठिकाणी आंदोलन केले.
त्यांच्या मागण्यांकडे शासनाने वेळीच लक्ष न दिल्यास होळीच्या तोंडावर एसटी संप होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होऊ शकतात. होळी सणामुळे अनेक प्रवासी आपल्या गावी जाण्याच्या तयारीत आहेत.
मात्र, एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यास ग्रामीण भागातील वाहतुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो. एसटी ही अनेक प्रवाशांसाठी महत्त्वाची जीवनवाहिनी असल्याने संपामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होईल.
दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ लागू आहे. मात्र, २०१८ पासूनचा महागाई भत्त्याचा फरक आणि अन्य थकबाकी अद्याप मिळालेली नाही.
न्यायालयाने थकबाकी देण्याचा आदेश दिला असला, तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना ५३ टक्के महागाई भत्ता दिला जात असला, तरी एसटी कर्मचाऱ्यांना केवळ ४३ टक्के भत्ता मिळत आहे
एसटी कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या पुढील प्रमाणे..
५३% महागाई भत्ता त्वरित लागू करावा, २०१६ ते २०२१ पर्यंतच्या घरभाडे भत्त्याची आणि वार्षिक वेतनवाढीची थकबाकी अदा करावी, जाचक शिस्त आणि आवेदन प्रक्रिया रद्द करावी, आरटीओ विभागाकडून चालकांवर होणारी अन्यायकारक दंडात्मक कारवाई थांबवावी.