दुबईत बसून पुण्यात चालवायचा ‘ते’ भयंकर रॅकेट; रोज उद्ध्वस्त करायचा शेकडो संसार, 15 दिवसांच्या गुप्त तपासानंतर पोलिसांचा मोठा पर्दाफाश

पुणे : पुण्यातील आयटी आणि व्यावसायिक क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या एका मोठ्या सायबर फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे हे रॅकेट प्रत्यक्षात दुबईतून संचालित होत असल्याचे तपासात समोर आले आहे.

मुंढवा पोलिसांनी हडपसर, फुरसुंगी आणि भेकराईनगर परिसरातील पाच ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करत या रॅकेटचा भांडाफोड केला. तब्बल १७ तास चाललेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणावर संगणकीय साहित्य, मोबाईल फोन, कागदपत्रे तसेच एक पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
तपासादरम्यान या संपूर्ण सायबर फसवणूक रॅकेटचा मुख्य सूत्रधार अमित मजेठिया हा दुबईतून कारभार सांभाळत असल्याचे उघड झाले. तर भागीरथ पांड्या हा पुण्यातून आर्थिक व्यवहार आणि नेटवर्कचे व्यवस्थापन करत होता. या दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील हालचाली सुरू आहेत.

आरोपी आलिशान कार्यालयांमधून नागरिकांना फोन करून ऑनलाईन गेमिंगमध्ये मोठा परतावा मिळण्याचे आमिष दाखवत होते. सुरुवातीला काही रक्कम जिंकवून विश्वास संपादन केला जात होता. त्यानंतर मोठी गुंतवणूक करण्यास भाग पाडून लाखो रुपयांची फसवणूक केली जात होती. विशेष म्हणजे, फसवणूक झालेल्या व्यक्तींनाच पैसे परत मिळवून देण्याचे आश्वासन देत पुन्हा एकदा आर्थिक गंडा घालण्यात येत होता.

या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी मुंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार शिवाजी जाधव आणि पोलीस अंमलदार योगेश राऊत यांनी १५ दिवस गुप्त तपास केला. त्यांच्या माहितीच्या आधारे सायबर तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने ही मोठी कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी संतोष दत्ता वेंजणेकर, विनायक उर्फ दीपक इक्के यांच्यासह अन्य अनेक आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.