पाकिस्तानच्या युवा खेळाडूचं भारताच्या ‘या’ स्टार खेळाडूसोबत गैरवर्तन, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…

नवी दिल्ली : आशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली असून काल भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगला होता. या सामन्यांकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. परंतु पावसामुळे सर्वांचा हिरमोड झाला.

पावसामुळे पाकिस्तानचा डाव झाला नाही. खूप वेळ वाट पाहून पंचांनी दोन्ही संघाच्या कर्णधारांशी बोलून सामना रद्द झाल्याचे घोषित केले. त्यानंतर पाकिस्तानच्या युवा खेळाडूने गैरवर्तन केल्याचे पाहायला मिळाले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये पाकिस्तानचा बॉलर हॅरिस रॉफ याने भारतीय संघाचा स्टार खेळाडू ईशान किशनला आऊट केले. त्यानंतर त्याच्याकडे पाहत चुकीच्या पद्धतीने हातवारे केले, असे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु भारतीय संघाला ४८.५ षटकांमध्ये केवळ २६६ धावा करता आल्या.

दरम्यान, संघाची अवस्था नाजूक असताना ईशानने ८१ बॉलमध्ये ८२ धावा केल्या. यात त्याने ९ चौकार आणि २ षटकार मारले. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला.
त्यानंतर पाकिस्तानी खेळाडूने त्याला चल निघ अशा पद्धतीने हातवारे केले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या खेळाडूला नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.