‘एकनाथ शिंदे-अजितदादांचा विजय ज्ञानेश कुमारांमुळेच’; राऊतांचा मोठा दावा, निवडणूक रद्द करण्याची मागणी

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ज्ञानेश कुमार यांच्यामुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले, असा दावा राऊत यांनी केला. तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी त्यांनी केली. राऊत यांच्या या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे.
माध्यमांशी बोलताना राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर ‘व्होट चोरी’ आणि ‘इलेक्शन चोरी’चा आरोप केला. ज्ञानेश कुमार यांना त्यांच्या पदावरून तातडीने हटवलं पाहिजे, असं ते म्हणाले. सरकारने याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा का घेतला जात नाही, असा सवाल करत राऊत यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या काही निर्णयांवर निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी मागील दहा महिन्यांत अनेकदा आक्षेप घेतल्याचा अहवाल समोर आला आहे. मतदार नोंदणी, मतदार यादीतील नावे हटवणे, अपील प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाच्या माहिती-संगणक प्रणालीशी संबंधित मुद्द्यांवर हे आक्षेप असल्याचं वृत्त आहे.


विशेषतः नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या नमुना क्रमांक सहामध्ये करण्यात आलेल्या बदलावरूनही वाद निर्माण झाला आहे. या बदलामुळे नव्या मतदारांकडून त्यांच्या किंवा त्यांच्या आई-वडिलांच्या अथवा आजी-आजोबांच्या जुन्या मतदार यादीतील नोंदीबाबत माहिती मागितली जात असल्याचं वृत्त आहे. या बदलावर दोन्ही निवडणूक आयुक्तांनी आक्षेप घेतल्याचा दावा करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणावर निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आयोगातील वेगवेगळी मतं आणि निरीक्षणं ही निर्णय प्रक्रियेतील सामान्य बाब असल्याचं आयोगाने म्हटलं आहे. गेल्या वर्षभरातील निर्णय पूर्ण आयोगाच्या एकमताने घेण्यात आल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे. त्यामुळे विरोधकांकडून करण्यात येणारे आरोप आणि आयोगाची भूमिका यामुळे वाद आणखी चर्चेत आला आहे.
राऊत यांनी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात संसदेत महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्याचीही भूमिका मांडली आहे. त्यांच्या विरोधात खासदारांच्या सह्या घेऊन कारवाईची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच बिहार, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील निवडणुका पुन्हा घेण्याची मागणी विरोधकांकडून होत असल्याचाही उल्लेख त्यांनी केला.
दरम्यान, या प्रकरणावर विरोधी पक्षांकडून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे, निवडणूक आयोगाने आपल्या निर्णय प्रक्रियेबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून सुरू झालेला हा आरोप-प्रत्यारोपांचा वाद आता निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीपर्यंत पोहोचला आहे.