“रीलस्टार म्हणून हिणवणी; तीन दिवसांच्या चर्चेत मी वाईट ठरलो का?” ओमराजे निंबाळकर यांचा संतप्त सवाल! धाराशिव राजकारण तापले

पुणे : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पुण्यातून धाराशिवकडे रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना सोशल मीडियावर सुरू असलेल्या टीकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “रीलस्टार म्हणून माझी हिणवणी केली जाते, फक्त तीन दिवसांच्या चर्चेनं मी एवढा वाईट ठरलो का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्यांनी सांगितले की मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेमुळे त्यांच्या कुटुंबावरही टीका केली जात आहे. “माझ्या अख्ख्या कुटुंबाचा उद्धार केला जातोय. नुसत्या चर्चेमुळे मी वाईट ठरत असेल तर ते अत्यंत दु:खद आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि वैयक्तिक हल्ल्यांवरही नाराजी व्यक्त केली.

ओमराजे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा उल्लेख करत मशाल चिन्हावर अपेक्षित यश न मिळाल्याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या मतदारसंघातील पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये एकही जागा जिंकता न आल्याचे त्यांनी नमूद केले. “लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लोकांनी साथ दिली, पण स्थानिक पातळीवर आमच्या कार्यकर्त्यांचा पराभव का झाला, याचा शोध घ्यावा लागेल,” असे त्यांनी सांगितले.


ते पुढे म्हणाले की, त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि सहकाऱ्यांनी 24 तास लोकांसाठी काम केले, तरीही अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे या पराभवामागील कारणांचा सखोल अभ्यास करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वडिलांच्या हत्येच्या प्रकरणाचा उल्लेख करताना ओमराजे भावुक झाले. “3 जून 2006 रोजी आमच्या कुटुंबाने जी वेदना भोगली, तीच वेदना पुन्हा जाणवते. त्या दिवसापासून माझ्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी हा प्रकार राजकीय वैमनस्यातून झाल्याचा पुनरुच्चार केला.
ते पुढे म्हणाले की, “एका व्यक्तीला संपवल्याने राजकीय विरोधक संपत नाही,” हे दाखवून द्यायचे आहे. तसेच न्यायासाठी ते हायकोर्टात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढील राजकीय भूमिकेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, धाराशिवमध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल. “सामान्य माणूस माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करूनच पुढील भूमिका ठरवणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
पक्ष नेतृत्वाबाबत थेट टीका टाळत त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाबद्दल आदर व्यक्त केला. “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
या सर्व घडामोडींमुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.