पुण्यात संतापजनक घटना! मोबाईल चॅटिंगवरून वाद; पतीचा हैवानपणा; पत्नीला मारहाण करत गळा दाबला अन्…

पुणे : मोबाईलवर चॅटिंगच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप असून, मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या मुलालाही मारहाण झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पुणे स्टेशन परिसरातील क्वीन्स गार्डन येथे ३० एप्रिल रोजी रात्री सुमारे आठच्या सुमारास घडली. मोबाईलवर चॅटिंग करत असताना पत्नीने जाब विचारल्याने पती संतापला आणि वाद विकोपाला गेला.
या रागातून आरोपीने पत्नीला शिवीगाळ करत बॅटने मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. तसेच, मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या मुलालाही मारहाण करून जखमी करण्यात आले. परिस्थिती अधिकच गंभीर होत पत्नीचा गळा आवळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.

या घटनेनंतर जखमी पत्नीने कोरेगाव पार्क पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे करत असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
