पुणे बाह्य रिंग रोडचे 32% काम पूर्ण; मुंबई, नाशिक, अहिल्यानगरकडे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा, प्रकल्पाची डेडलाइनही समोर


पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून उभारला जात असलेला महत्त्वाकांक्षी पुणे रिंग रोड प्रकल्प वेगाने पुढे सरकत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माहितीनुसार, या प्रकल्पाचे सुमारे 32 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू आहे.

हा रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक शहराबाहेरून वळवता येणार आहे. त्यामुळे पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील ताण कमी होऊन वाहतूक कोंडीत मोठी घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच मुंबई, नाशिक, अहिल्यानगर, सासवड आणि कोकणकडे जाणाऱ्या वाहनांना शहरात प्रवेश न करता थेट प्रवास करता येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिंग रोडच्या पश्चिम भागाचे काम 2027 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पश्चिम भाग 2027 मध्ये, तर पूर्व भाग 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करण्यासाठी विविध ठिकाणी एकाचवेळी काम सुरू असून MSRDC त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

एकूण 173 किलोमीटर लांबीचा हा रिंग रोड प्रकल्प पुणे शहर आणि उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. 2007 मध्ये या प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली होती. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ कमी होण्यासोबतच शहरातील प्रदूषणात सुमारे 25 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे.
सध्या रिंग रोडच्या पूर्वेकडील भागाचे काम 12 पॅकेजमध्ये विभागून सुरू आहे.

त्यापैकी 9 पॅकेजवर प्रत्यक्ष काम सुरू झाले असून उर्वरित 3 पॅकेजना नुकतीच मंजुरी मिळाली आहे. खडकवासला, मुळशी, चाकण, हिंजवडी, सिंहगड, उर्से आणि सोरतापवाडी परिसरात कामाला वेग आला आहे. प्रकल्पासाठी 30 महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली असून विलंब झाल्यास संबंधित कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा असून शहरातील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!