घराचे स्वप्न साकार करण्याची संधी! मुंबई-पुणे हायवेलगत ताथवडे येथे म्हाडाच्या ७९२ घरांची लॉटरी; नोंदणी सुरू, त्वरित करा अर्ज

पुणे : स्वतःच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी म्हाडाच्या पुणे मंडळाकडून आनंदाची बातमी समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडजवळील ताथवडे येथील गृहप्रकल्पातील ७९२ सदनिकांची सोडत ८ जुलै २०२६ रोजी काढण्यात येणार आहे.

या लॉटरीसाठी आज, सोमवार (२७ एप्रिल) दुपारी १.३० वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ताथवडे येथील हा प्रकल्प पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-बंगळुरू महामार्ग यांच्या जवळ असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे.
तसेच हिंजवडी आयटी हब आणि पिंपरी-चिंचवड औद्योगिक पट्ट्याच्या जवळ असल्यामुळे या प्रकल्पाला मोठी मागणी आहे. हा प्रकल्पाचा अंतिम टप्पा असून, यापूर्वी पहिल्या टप्प्यातील ६०० हून अधिक घरे यशस्वीपणे विकली गेली आहेत.

या सोडतीमध्ये अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गट यांच्यासाठी घरे उपलब्ध आहेत.
अल्प उत्पन्न गटासाठी: २४ सदनिका (५९–६० चौ. मी.), किंमत अंदाजे ४६–४७ लाख रुपये
मध्यम उत्पन्न गटासाठी: ७६८ सदनिका (६९–७० चौ. मी.), किंमत अंदाजे ६४.५०–६५.५० लाख रुपये

इच्छुक नागरिकांना आजपासून म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २ जून २०२६ आहे.
त्यानंतर ३० जून रोजी पात्र अर्जांची यादी जाहीर केली जाईल, तर ८ जुलै रोजी दुपारी १२ वाजता ऑनलाइन सोडतीचा निकाल घोषित करण्यात येणार आहे.