‘एकच नाव, दुसरा पर्यायच नाही!’ अमित शाहांनी केली मोठी घोषणा; बंगालच्या गादीवर शुभेंदू अधिकारी

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या राजकारणात अखेर मोठा सस्पेन्स संपला असून भाजपने शुभेंदू अधिकारी यांच्या नावावर मुख्यमंत्रीपदाची अधिकृत मोहोर उमटवली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः कोलकात्यात झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शुभेंदू अधिकारी यांची पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्रीपदी घोषणा केली. विशेष म्हणजे, “आठ प्रस्ताव आले पण सर्वांमध्ये एकच नाव होतं,” असं सांगत अमित शाह यांनी शुभेंदू अधिकारी यांच्यावर पक्षाचा पूर्ण विश्वास असल्याचा स्पष्ट संदेश दिला.

भाजपला पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू होती. मात्र अखेर पक्षाने सर्वात आक्रमक आणि प्रभावी चेहरा मानल्या जाणाऱ्या शुभेंदू अधिकारी यांच्याकडे राज्याची धुरा सोपवली आहे. अमित शाह म्हणाले, “निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत जवळपास आठ प्रस्ताव आले. मात्र प्रत्येक प्रस्तावात एकच नाव होतं. दुसऱ्या नावासाठी योग्य वेळ देण्यात आला, पण दुसरं कोणतंच नाव समोर आलं नाही. त्यामुळे केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून मी शुभेंदू अधिकारी यांना पश्चिम बंगाल विधानमंडळ पक्षाचे नेते म्हणून जाहीर करतो.”
भाजपने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल २०७ जागांवर विजय मिळवत पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या दीर्घकाळाच्या सत्तेला धक्का देत भाजपने बंगालमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. या विजयामध्ये शुभेंदू अधिकारी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या शुभेंदू अधिकारी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी आणि टीएमसीवर जोरदार हल्लाबोल केला होता.

विशेष म्हणजे, नंदीग्रामनंतर भवानीपूरमध्येही ममता बॅनर्जी यांना पराभूत करून शुभेंदू अधिकारी यांनी स्वतःची ताकद सिद्ध केली होती. त्यामुळेच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये दोन उपमुख्यमंत्री नेमले जाण्याचीही जोरदार चर्चा असून लवकरच त्याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीनंतर बंगालमध्ये भाजपच्या नव्या सत्तासमीकरणाला अधिकृत सुरुवात झाल्याचं मानलं जात आहे.