कांद्याने गाठला ५३ रुपयांचा टप्पा, साखरही २२ टक्क्यांनी महागली! ४२ पैकी ४१ वस्तूंचे दर वाढले, पाहा तुमच्या ताटातील काय काय महागलं?

पुणे : आधी कांदा, आता डाळी, खाद्यतेल आणि साखर… स्वयंपाकघरातील जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या वस्तूच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार वाढला आहे. सरकारच्या देखरेखीखाली असलेल्या ४२ जीवनावश्यक वस्तूंपैकी तब्बल ४१ वस्तू वर्षभरात महागल्या आहेत. कांद्याच्या किमतीत तब्बल ११३ टक्क्यांची वाढ झाली असून, तूरडाळ, सूर्यफूल तेल आणि साखरेचे दरही वाढले आहेत. १२ ऑक्टोबरपर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीतून महागाईचं हे चित्र समोर आलं आहे. केवळ बटाट्याच्या दरात घट झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

महागाईचा दर दोन वर्षांतील उच्चांकावर
सांख्यिकी मंत्रालयाने १२ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईचा दर ५.५ टक्क्यांवर पोहोचला. हा गेल्या दोन वर्षांतील उच्चांक असल्याचं वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. अन्नपदार्थांच्या वाढत्या किमती हे त्यामागील प्रमुख कारण ठरलं. सप्टेंबरमध्ये वार्षिक अन्नधान्य महागाईचा दर ७.७४ टक्के नोंदवण्यात आला.


तूरडाळ १२९ रुपये, चणाडाळही महाग
डाळींच्या किमतीतही वाढ झाली आहे. तूरडाळीचा सरासरी दर वर्षभरापूर्वी किलोमागे ११३ रुपये होता; तो आता १२९ रुपयांवर पोहोचला आहे. चार प्रमुख महानगरांमध्ये तूरडाळ १४० ते १४५ रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. चणाडाळीचा सरासरी दरही ६.४ टक्क्यांनी वाढून ८५ रुपयांवरून ९१ रुपये प्रति किलो झाला आहे. डाळींचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकार राखीव साठ्यातील हरभरा बाजारात आणण्याचा विचार करू शकते, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली आहे.
खाद्यतेल, साखरेच्या दरातही मोठी वाढ
सूर्यफूल तेलाचा सरासरी दर १८ टक्क्यांनी वाढून १९१ रुपये प्रति लिटर झाला आहे. पाम तेल १५.२ टक्के, तर सोयाबीन तेल १४.६ टक्क्यांनी महागलं आहे. मोहरीच्या तेलाचा दरही वर्षभरापूर्वीच्या १८८ रुपयांवरून २०४ रुपये प्रति लिटर झाला. साखरेची किंमत सध्या किलोमागे ५६ रुपये आहे. महिनाभरापूर्वी ती सुमारे ५९ रुपये होती; मात्र वर्षभराच्या तुलनेत साखर अजूनही २२ टक्क्यांनी महाग आहे.
महाराष्ट्रातील कांद्याच्या उत्पादनात घट; दर आणखी वाढणार?
सर्वाधिक दरवाढ कांद्याच्या किमतीत झाली आहे. कांदा सध्या सुमारे ५३ रुपये प्रति किलो दराने विकला जात असून, वर्षभरात त्याच्या किमतीत जवळपास ११३ टक्क्यांची वाढ झाली आहे. देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात खरीप कांद्याचं उत्पादन अंदाजे ५ ते ७ टक्क्यांनी घटल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. लागवडीखालील क्षेत्र कमी होणं आणि मान्सूनच्या पावसाला झालेला विलंब ही त्यामागील कारणं सांगितली जात आहेत. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीमुळे कांद्याचे दर आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
तांदूळ, गहू आणि टोमॅटोही महागले
सामान्य तांदळाचा सरासरी दर सुमारे १२ टक्क्यांनी वाढून ४७ रुपये प्रति किलो झाला आहे. गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किमतीत मात्र किरकोळ वाढ झाली आहे. टोमॅटोचा दर १२ ऑक्टोबरला ४२ रुपये प्रति किलो होता; वर्षभरापूर्वी तो ३६ रुपये होता. दुसरीकडे, बटाट्याच्या किमतीत सहा टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. खरीप हंगामातील नवीन कांदा बाजारात दाखल झाल्यानंतर दर कमी होतील, अशी सरकारला अपेक्षा आहे. मात्र, तोपर्यंत वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या घरखर्चाचं गणित बिघडण्याची शक्यता आहे.
