जुनी मारुती गाडी, कारखान्याच्या पायरीवर नतमस्तक, 22 वर्षांच्या संघर्षानंतर पृथ्वीराज जाचक छत्रपती वाचवण्यासाठी पुन्हा मैदानात…

भवानीनगर : छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगरच्या चेअरमनपदी आज पृथ्वीराज जाचक यांची निवड झाली. यानंतर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव जाचक यांची गाडी घेऊन पृथ्वीराज जाचक कारखान्यात आले. कारखान्यासमोर नतमस्तक झाले. 22 वर्षानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी कारखान्याची सूत्र हातात घेतली.

आज अनेक सभासदांच्या मनातील स्वप्न पूर्ण झाल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली. जाचक कुटुंबाचे छत्रपती कारखान्यासाठी मोठं योगदान आहे. हा कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जाचक बापू यांचे प्रयत्न सुरू आहेत. आज छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगरच्या चेअरमन पदी पृथ्वीराज जाचक यांची एकमताने निवड करण्यात आली.
आज सभासदांच्या मनातला नेता चेअरमन झाल्याने सभासदांनी एकच जल्लोष केला. कारखाना गेल्या काही दिवसांपासून अडचणीत आहे. हा कारखाना फक्त पृथ्वीराज जाचक हेच अडचणीतून बाहेर काढतील असा विश्वास सभासदांमध्ये आहे. यामुळे अनेकांची इच्छा आज पूर्ण झाली. कारखान्याला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देऊ, अशी ग्वाही देखील यावेळी जाचक यांनी दिली.

जाचक हेच चेअरमन झाल्याने सभासदांमध्ये नवचैतन्याचे वातावरण असून आता चांगला बाजारभाव तसेच इतर सोयी योग्य पद्धतीने मिळेल. कारखान्याचा कारभार देखील योग्य पद्धतीने चालेल, असा सभासदांना विश्वास आहे. गेल्या दहा वर्षात अनेकांच्या उसाला वेळेवर तोड आली नाही.

अनेक कामगार फक्त पंचिग करून बाहेर निघून जात होते. यामुळे कारखान्याला कोणती शिस्त राहिली नव्हती. यामुळे मोठी अडचण निर्माण झाली. यामुळे आता बापूशिवाय पर्याय नसल्याचे अनेकांनी आधीच सांगितले आणि तसे मतदान देखील केले. आता येणाऱ्या काळात पृथ्वीराज बापू कारखाना कसा अडचणीतून बाहेर काढणार याकडे सर्व सभासदांचे लक्ष लागले आहे.