“शपथ घेतली आणि लगेच निर्णयांचा धडाका!” मुख्यमंत्री होताच थलपती विजय ॲक्शन मोडमध्ये; तीन मोठ्या घोषणांनी तमिळनाडूत खळब


तमिळनाडू : तमिळनाडूच्या राजकारणात अखेर मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. अभिनेता ते नेता असा प्रवास करणाऱ्या जोसेफ विजय यांनी आज तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच अवघ्या काही मिनिटांत तीन मोठे निर्णय घेत राज्याच्या राजकारणात जोरदार एन्ट्री केली. चेन्नईतील नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये पार पडलेल्या भव्य शपथविधीनंतर विजय यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन महत्त्वाच्या फाईल्सवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यांच्या या निर्णयांमुळे राज्यभरात मोठी चर्चा रंगली आहे.

राज्यपाल विश्वनाथ अर्लेकर यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी त्यांच्या पक्षातील ९ मंत्र्यांनीही शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक, कार्यकर्ते आणि राजकीय नेते उपस्थित होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची उपस्थितीही विशेष चर्चेत राहिली. विजय यांनी शपथ घेताच सभागृहात टाळ्या, शिट्ट्या आणि घोषणांचा जल्लोष झाला. त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यांतही यावेळी आनंदाश्रू पाहायला मिळाले.

मुख्यमंत्री होताच विजय यांनी सर्वसामान्यांना दिलासा देणारे आणि कायदा-सुव्यवस्थेला बळकटी देणारे तीन मोठे निर्णय घेतले. घरगुती ग्राहकांना दरमहा २०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय त्यांनी मंजूर केला. त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी विशेष पथक स्थापन करण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला. महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र महिला सुरक्षा दल उभारण्याचाही मोठा निर्णय विजय यांनी घेतला आहे.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाने १०८ जागांवर विजय मिळवत मोठा धक्का दिला होता. मात्र बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठण्यासाठी पक्षाला मोठी कसरत करावी लागली. काँग्रेसच्या ५ आमदारांनी सुरुवातीलाच पाठिंबा दिला, तर नंतर व्हीसीके आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या आमदारांच्या पाठिंब्यामुळे अखेर विजय यांचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला.

अभिनेता म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या विजय यांनी काही वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश करत भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, शिक्षण आणि रोजगार यांसारख्या मुद्द्यांवर भर दिला होता. आता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच घेतलेल्या जलद निर्णयांमुळे “थलपती” विजय खऱ्या अर्थाने ॲक्शन मोडमध्ये आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!