आता घरबसल्या ई-रेशन कार्ड काढता येणार, सरकारी कार्यालयातील ‘मारितो चकरा’ थांबणार; जाणून घ्या प्रोसेस…

पुणे : राज्यातील नागरिकांसाठी शिधापत्रिका मिळवण्याची प्रक्रिया आता आणखी सुलभ झाली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने ई-रेशन कार्ड ही सुविधा सुरू केली असून, नागरिकांना आता घरबसल्या रेशन कार्डसाठी अर्ज करून ते ऑनलाइन मिळवता येणार आहे.

या ई-रेशन कार्डच्या सहाय्याने पत्ता बदल, गावातील दुरुस्ती, रेशन कार्डमध्ये नवीन सदस्यांची नावे समाविष्ट करणे किंवा नावे वगळणे यांसारखी कामे सोप्या पद्धतीने करता येणार आहेत. यामुळे शासकीय कार्यालयांचे फेरे मारण्याची गरज कमी होणार असल्याचे तहसीलदार पुरंदर विक्रम राजपूत यांनी सांगितले.
ई-रेशन कार्ड सेवेमुळे मध्यस्थ किंवा एजंटमार्फत होणारी लूट थांबणार आहे. ही सेवा पूर्णपणे विनामूल्य असून नागरिकांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. पुरवठा नायब तहसीलदार गोपाळ ठाकरे यांनी सांगितले की, नागरिकांनी एजंट किंवा मध्यस्थांकडून अर्ज न करता थेट http://roms.mahafood.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज मंजूर झाल्यानंतर ई-शिधापत्रिका थेट ऑनलाइन उपलब्ध होईल. सध्या तहसील कार्यालयातही या सेवेसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत.

पुरवठा शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुलै २०२५ महिन्यात सुमारे १,२०० अर्जांवर कार्यवाही पूर्ण झाली आहे. यामध्ये नवीन शिधापत्रिका देणे, विद्यमान शिधापत्रिकेत सदस्यांची नावे समाविष्ट करणे आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील नोंदी अद्ययावत करणे यांचा समावेश आहे. प्रलंबित प्रकरणे वेळेत सोडवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी प्रलंबित प्रकरणांची सोडवणूक केली जाईल.
