नितेश राणेंना झटका, मटन दुकानांना मल्हार सर्टिफिकेटवर जेजुरी विश्वस्तांचा आक्षेप…

Malhar Certificate : राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास आणि भाजप मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एका नव्या घोषणामुळे वाद उफाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही नितेश राणे यांनी मटणांच्या दुकानांवरुन अनेक वक्तव्य केली आहेत.
आता तर त्यांनी राज्यातील सर्व झटका मटण आणि चिकन विक्रेत्यांच्या नोदणींसाठी पोर्टल सुरु करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या सर्व नोंदणीकृती मांस विक्रेत्यांना ‘मल्हार प्रमाणपत्र’ दिलं जाणार आहे.
यावरून सध्या राज्यात चर्चा तर सुरू आहेत परंतु मल्हार हे नाव देण्यावरून अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री मार्तंड देवस्थान जेजुरीच्या विश्वस्तांमध्येच दोन विचार प्रवाह निर्माण झाले आहेत एका विश्वस्ताचा या निर्णयाला पाठिंबा तर दुसऱ्याचा विरोध असे चित्र आहे.
मटन दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्यासंदर्भातील नितेश राणे यांच्या निर्णयावर जेजुरीच्या श्री मार्तंड देवस्थानचे विश्वस्त श्री राजेंद्र खेडेकर यांनी हे नाव त्वरित बदलावे अशी मागणी केली आहे. श्री खेडेकर यांच्या मते श्री मल्हार म्हणजे खंडोबा देव हे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहे आणि ते शाकाहारी आहे. या संदर्भात नितेश राणे यांना खेडेकर यांनी पत्र दिले आहे.
यामध्ये खेडेकर यांनी नमूद केले आहे की, मटन दुकानदारांना सर्टिफिकेटच्या माध्यमातून योग्यतेचा दर्जा देणे हा निर्णय योग्य आहे, जेणेकरून आपण कोणाकडून मटन घेत आहोत आणि ते किती विश्वासाला आहे हे निश्चित होईल त्याचबरोबर कुत्रे आणि गोमांस विक्रीला आळा बसेल.
मात्र हे करताना एक मल्हार भक्त म्हणून एक सूचना आहे की या योजनेचे नाव त्वरित बदलावे. श्री मल्हार म्हणजे खंडोबा… अवघ्या महाराष्ट्राचे दैवत. ही देवता पूर्णपणे शाकाहारी आहे. देवाला फक्त पुरणपोळी किंवा चंपाषष्ठीच्या काळात वांग्याचे भरीत रोडगा नैवेद्य असतो. इतकेच नव्हे तर खंडोबा ही देवता मुक्या जनावरांवर नितांत प्रेम करणारी देवता आहे. म्हणून देवाच्या बाजूला नेहमी घोडा, कुत्रे, बैल आदी प्राण्यांचा सहवास असतो.